spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सर्व धर्मांचा सन्मान हाच विश्वशांतीचा आधार

– श्री गुरुदेव सेवा मंडळात विश्वशांती दिन उत्साहात; राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा 

नागपूर :- सर्व धर्मांचा सन्मान, परस्परांमध्ये बंधुभाव आणि मानवतेची भावना जोपासणे हाच खऱ्या अर्थाने विश्वशांतीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. अशोक यावले यांनी केले. श्री गुरुदेव सेवा मंडळ, सुभाष रोड, नागपूर च्यावतीने विश्वशांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विश्वशांती दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मानवतावादी विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ॲड.अशोक यावले म्हणाले की, जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी धर्म, जात, पंथ आणि प्रांत यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीला केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक धर्माचा आदर आणि सन्मान करण्याची वृत्ती समाजात रुजली, तर परस्परांतील गैरसमज दूर होऊन सामाजिक सलोखा आणि विश्वबंधुत्वाची भावना अधिक बळकट होईल. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते राजाभय्या हांडा यांनी विश्वशांती आणि पर्यावरण संवर्धन यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. पर्यावरणाचा समतोल राखणे ही केवळ निसर्गाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पर्यावरणाचे रक्षण केले तरच भावी पिढ्यांना सुरक्षित आणि शांततामय जीवन मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे अरुण वराडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा दिला. ग्रामविकास, स्वच्छता, व्यसनमुक्ती, सामाजिक एकोपा आणि मानवसेवा यांसारख्या विषयांवर राष्ट्रसंतांनी दिलेला संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव पुनसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने श्री गुरुदेव उपासक व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी विश्वशांती, सामाजिक सलोखा आणि मानवतेच्या मूल्यांना बळ देण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव राजेश कुंभलकर यांनी तर कोषाध्यक्ष दिलीप सुरकार यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर आणि विश्वशांतीचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.