कामठी २४ : कामठी आणि नवी कामठीला जोडणाऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजवरील महाकाय गर्डर बसवण्याचे काम मागील महिन्यात दोन तासांच्या रेल्वे ब्लॉकनंतर यशस्वीपणे पूर्ण झाले होते. मात्र, गर्डर बसवल्यानंतर तत्काळ रेल्वे प्रशासनाने रमाई नगर येथील रेल्वे फाटक बंद केले, त्यामुळे कामठी आणि नवी कामठीतील नागरिकांच्या दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत माजी नगरसेवक लालसिंग यादव, संध्या रायबोले आणि प्रतिक पडोळे यांनी महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत, ना. बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या दालनात रेल्वे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (विशेष प्रकल्प) अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
त्याअनुषंगाने आज रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पराग ठमके, उपअभियंता महेश पाचकवडे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या वेळी माजी नगरसेवक लालसिंग यादव, सौ. संध्या रायबोले, प्रतिक पडोळे, भाजपा पदाधिकारी राजेश खंडेलवाल, रजत यादव, विक्की बोंबले, शंकर चवरे, उमेश जगणे, अरविंद चवडे, देवानंद कांबळे, भारत सोनी हे उपस्थित होते. या पाहणीत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि पुढील आठ दिवसांत रमाई नगर रेल्वे क्रॉसिंग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
अधिक महत्त्वाचे म्हणजे, कामठीच्या जयस्तंभ चौकापर्यंतचा सर्विस रोड, नवी कामठीतील घोरपड टी पॉइंट, रविदास नगर, रामगड, हनुमान मंदिर येथील सर्विस रोड, तसेच स्ट्रीट लाइट्स, ड्रेनेज व इतर मूलभूत सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. या संदर्भात दोन्ही विभागांमध्ये समन्वय साधून कामे करण्यावर एकमत झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या सकारात्मक पुढाकाराबद्दल महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.




