कामठी :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत येरखेडा नगर पंचायत परिसरातील विविध पोलिओ लसीकरण केंद्रांना भेट देऊन नगराध्यक्ष राजकीरण बर्वे यांनी पोलिओ डोज लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. लसीकरणाची अंमलबजावणी, लाभार्थी बालकांची उपस्थिती तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याची पाहणी यावेळी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान भारतीय जनता पार्टी येरखेडा अध्यक्ष राकेश काळे, येरखेडा नगर पंचायत गटनेते. गजानन तिरपुडे तसेच मनीष भाटी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करत लसीकरण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी “दोन थेंब जीवनाचे” हा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवून ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या पाल्यांना पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहनही करण्यात आले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाला येरखेडा परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, पोलिओमुक्त समाजाच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




