– पवनी तालुक्यात अवैध उत्खननावरून शिवसेना (उबाठा) आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव प्रक्रियेत अडकले असताना, काही विशिष्ट आदेशांच्या आधारे जिल्ह्यातील सुमारे २० ते २२ घाटांना उत्खननाची परवानगी मिळाली आहे. मात्र, या संधीचा फायदा घेत घाटधारकांनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून शासनाच्या महसुलाची मोठी लूट सुरू केली आहे. पवनी तालुक्यातील रेती घाटांमधून रॉयल्टीच्या खेळातून शासनाला दररोज लाखोंचा चुना लावला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला असून, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
पवनी तालुक्यातील गुडेगाव, खातखेडा, जुनोना, शिवनाळा व इतर घाटांवर सध्या पोकलेन मशीनच्या साहाय्याने रात्रंदिवस रेतीचा उपसा सुरू आहे. येथून दररोज सुमारे २०० ते ३०० मोठे टिप्पर रेती घेऊन बाहेर पडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील बहुतांश टिप्परकडे एकतर रॉयल्टी नसते किंवा केवळ २ ते ३ ब्रासची रॉयल्टी दाखवून त्यात १० ते १२ ब्रास रेती ओव्हरलोड भरली जात आहे.
सुपर एन्ट्री’चा नवा फंडा
रॉयल्टी कमी आणि माल जास्त असलेल्या या टिप्परवर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी घाटधारक आणि टिप्पर मालकांकडून “सुपर एन्ट्री”च्या नावाखाली प्रति टिप्पर १ लाख १५ हजार रुपये गोळा केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ही रक्कम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करण्यासाठी वापरली जात असल्यानेच, रस्त्यावर राजरोसपणे धावणाऱ्या या ओव्हरलोड वाहनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या माध्यमातून शासन दरबारी जमा होणारा मोठा महसूल बुडत असून अधिकारी आणि घाटधारक मात्र मालामाल होत आहेत.
कधीतरी महसूल किंवा पोलीस विभागाकडून एखाद्या ट्रॅक्टरवर कारवाई करून आपण कर्तव्यदक्ष असल्याचे सोंग मिरवले जाते. मात्र, मोठ्या टिप्परच्या माध्यमातून होणारी ही संघटित लूट थांबवण्यास प्रशासन अपयशी ठरल्याची टीका शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
कमी ब्रासची रॉयल्टी फाडून ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर महसूल, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), खनिकर्म आणि पोलीस विभागाने तात्काळ संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी दिला आहे.
निवेदन देतेवेळी तालुकाप्रमुख तिलक सार्वे, उपतालुकाप्रमुख राजेश नान्हे, प्रशांत देशमुख, विभाग प्रमुख आकाश बांते, गौरव सावरकर, दुर्गेश नान्हे, सोमेश्वर सेलोकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी, भंडारा यांनाही माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.
या तक्रारीनंतर आता तरी निद्रिस्त प्रशासन जागे होणार का? की हा ‘लुटीचा खेळ’ असाच सुरू राहणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




