spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राहुल गांधी यांच्या फुसक्या बाराची वकीली, चमचेगीरी संजय राऊत करतात

– भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार

मुंबई :- राहुल गांधींनी काल जो बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न केला, तो खरं तर बॉम्ब नव्हे तर फुसका बार होता. ती सुरसुरी होती याचा प्रकाश राहुल गांधींच्या डोक्यात पडायला हवा होता पण दुर्दैवाने तो पडत नाही आणि त्याच फुसक्या बाराची बाजू घेण्याचे काम संजय राऊत करतात, या शब्दांत भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी “राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब अजून टाकलेला नाही” या खा. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या जनतेने आधीच मतांचा हायड्रोजन बॉम्ब राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यावर टाकून त्यांना पराभूत केलं आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी बन यांनी “वाराणसीत हादरे बसतील” या संजय राऊत यांच्या विधानावर पलटवार केला. ते म्हणाले, वाराणसीमध्ये काय आहे? सलग तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेनं निवडून दिलं. त्यामुळे वाराणसीमध्ये नव्हे तर हादरे बसलेत ते महाराष्ट्रात तुम्हालाच बसलेत. लोकसभेत हादरे, विधानसभा निवडणुकीत हादरे आणि या लागोपाठच्या हाद-यांमुळे अजूनही राऊत यांची झोप उडालेली आहे असा टोला त्यांनी लगावला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मतदार तुम्हाला पुन्हा मतांचा बॉम्ब टाकून हादरे दिल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही दिला.

राऊत हे राहुल गांधींचे प्रवक्ते

निवडणूक आयोग भाजपाची चमचेगीरी करतो, आयोग भाजपाचा कार्यकर्ता आहे, या राऊत यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेत बन म्हणाले की, राहुल गांधी यांचे प्रवक्ते असलेल्या राऊत यांना निवडणूक आयोगावर बोलण्याचा अधिकार नाही. राहुल गांधी दिल्लीत बोलले की लागलीच दुसऱ्या दिवशी मुंबईत राऊत त्याची दवंडी पिटतात. काल राहुल गांधी म्हणाले की लोकशाही वाचवणे माझं काम नाही, या त्यांच्या वक्तव्याचे देखील राऊत समर्थन करतात का? असा सवाल त्यांनी केला.  राऊत यांनी आधी सिल्व्हर ओक, राहुल गांधींची चमचेगीरी थांबवावी असा खोचक सल्लाही दिला. मातोश्रीचे मीठ खात असताना राऊत उद्धव ठाकरे यांना कसे अडचणीत आणतात, हे जनतेला ठाऊक आहे असेही ते म्हणाले.

देवाभाऊ प्रत्येक समाजासाठी आशेचा किरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त ओबीसी समाजासाठी, फक्त मराठा समाजासाठी नाहीत, तर महाराष्ट्रातील 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार यांच्यासह प्रत्येक नागरिकासाठी आशेचा किरण आहेत. त्यांच्या नेतृत्वात सर्वांचा विकास होतोय असे श्री. बन म्हणाले. राऊत मात्र गोंधळाचा ढग आहेत अशी खिल्ली त्यांनी उडवली.

स्व. आनंद दिघेसाहेबांनी शिवसेना वाढवली आणि राऊतांनी शिवसेना हिरवी सेना करून संपवली.अफजलखानाचा, औरंगजेबाचा वारसा पुढे नेणारे संजय राऊत, दिघेसाहेबांविषयी चकार शब्द काढण्याच्या लायकीचे नाहीत असा घणाघात बन यांनी केला. स्व.आनंद दिघे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला.

भाजपा पाकिस्तानप्रेमी आहे या भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपावर बन यांनी प्रहार केला.

पाकिस्तानवर कुणाचे प्रेम आहे हे महाराष्ट्राने पाहिलेय. पाकिस्तानचे झेंडे आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा उबाठा गटाच्या रॅलीत झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादावर भाष्य करण्याचा अधिकार जाधवांना नाही असेही ते म्हणाले.

मत नाही, मती चोरीला गेलीय असे म्हणत बन यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसचे देशभरात सलग 40 पराभव झालेत. मुंबईत काँग्रेस संपली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे काँग्रेसचा देशभर पराभव होतोय आणि त्याच राहुल गांधींच्या सोबत राहून तुमचीही मती चोरीला गेली आहे अशी टीका त्यांनी केली.

रोहित पवार यांची केवळ शरद पवारांचे नातू हीच ओळख

रोहित पवार यांना महाराष्ट्रातल्या जनतेनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. रोहित फक्त दीड हजार मतांनी निवडून आलेत. शरद पवार यांचे नातू हीच रोहित पवार यांची ओळख असून वेगळे काहीही कर्तृत्व नाही अशी टीका त्यांनी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.