spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अडीच वर्षांतील वसुलीपैकी 40 हजार कोटी संजय राऊतांनी शेतकऱ्यांना द्यावेत

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ओढले कोरडे

कुंभमेळ्यातला खर्च कमी करून तो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची मागणी करणाऱ्या जनाब संजय राऊतांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना कोविडकाळात दररोज 100 कोटी या हिशेबाने अडीच वर्षांत गोळा केलेल्या 90 हजार कोटी रुपयांपैकी किमान 40 हजार कोटी रुपये मराठवाडा, विदर्भातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची घोषणा उद्धव ठाकरे, शरद पवार, अनिल देशमुख यांनी करावी, असे कोरडे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी ओढले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरात सेवाकार्य सुरू आहे. तुमच्यासारखे मेवा खाण्याचे काम भाजपा करत नाही. मेवा खाण्याचा इतिहास जनाब संजय राऊत, तुमचा, तुमच्या पक्षाचा आणि उद्धव ठाकरेंचा आहे. संजय राऊतांचा आक्षेप कुंभमेळ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सेवा सप्ताहानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांवर आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे हे हज यात्रा, जुलूस आणि उरूसाला विरोध करणार नाहीत. औरंगजेबाच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला, त्याला विरोध करणार नाहीत. हिंमत असेल तर हज यात्रा, जुलूसवरील खर्चालाही विरोध करा. तिथे मात्र तुम्ही मूग गिळून गप्प बसणार आणि हिंदूंच्या सणांकडे बोट दाखवणार, अशी टीका बन यांनी केली.

बन पुढे म्हणाले, कॅबिनेटची बैठक स्टेडियममध्ये घ्यायला ती काही क्रिकेटची मॅच नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कॅबिनेटच्या बैठका घरात बसून ऑनलाइन करत होते. ज्यांनी स्वतः कॅबिनेटची बैठक मातोश्रीत घेतली त्यांनी इतरांना सल्ला देऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेईल, अशी खात्री आहे. कुठलीही निवडणूक नसताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरितही झाला. मराठवाडा, विदर्भ, सोलापूरच्या काही भागांमध्ये, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळासदृश परिस्थिती आहे. मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जातो आणि शेतकऱ्यांना आधार देतो. पवार साहेबांनी त्यांचे मुख्यमंत्रीपद असताना जलसिंचनाच्या योग्य उपाययोजना केल्या असत्या, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असते, तर आज राज्यात दुष्काळच राहिला नसता.

पाकिस्तानने दहशतवादी कारवाया सुरु ठेवल्या तर पाकिस्तानी दहशतवाद्यांना घरात घुसून मारणे हे भारताचे परराष्ट्र धोरण आहे. याआधी काँग्रेसच्या काळात परराष्ट्र धोरण काय होते, हा इतिहास संजय राऊतांनी एकदा वाचावा. नकला करणे हा राहुल गांधींचा स्वभाव झालाय आणि नक्कलकार संजय राऊत रोज सकाळी नकलाच करत असतात. नक्कल करायला अक्कल लागत नाही. दुर्दैवाने संजय राऊतांकडे अक्कल नसल्याने फक्त नक्कल करण्यात ते पटाईत झाले आहेत. ज्या देशाच्या विरोधी पक्षनेत्यांनी शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडायला पाहिजेत ते सोडून कॉमेडी सर्कसप्रमाणे नक्कल करत आहेत, असे बन यांनी सुनावले.

रोहित पवार, पोर्टलची चिंता करू नका तर आपल्या पक्षाची चिंता करा. पोर्टलची चिंता करण्यासाठी सरकार सक्षम आहे. रोज उठून ते नौटंकी करतात. कालही रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. परंतु बारामतीत ऊसदर दिला नाही, एफआरपी दिली नाही. रोहित पवारांच्या कारखान्याने अनेक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. रोहित पवारांनी मगरीचे अश्रू ढाळण्यापेक्षा आपल्या कारखान्याची थकबाकी आधी द्यावी आणि मग इतरांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करावे, असे बन यांनी फटकारले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.