– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार
मुंबई :- भाजपाचे अंतरंग काय आहे ते सांगण्याच्या भानगडीत संजय राऊतांनी पडू नये. कारण तुमचे अंतर्वस्त्र काढण्याचे काम जनतेने विधानसभा, महापालिका निवडणुकीत केल्याने तुमच्याकडे अंतर्वस्त्रे शिल्लक नाहीत. रोज सकाळी उठून नऊ वाजता कोण भुंकतेय आणि कोणाला भुंकण्याची जबाबदारी दिली हे महाराष्ट्राने पाहिले आहे. रोज सकाळी विरोधकांवर खालच्या शब्दांमध्ये टीका करत महाराष्ट्राची संस्कृती तळाशी नेण्याच्या कामाची सुरुवात संजय राऊत यांनी केली, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला.
उद्धव ठाकरेंना विधान परिषद निवडणुकीत संधी मिळावी अशी संजय राऊत यांची अजिबात इच्छा नाही. कारण आता उद्धव ठाकरेंना विधान परिषद दिली तर राज्यसभा संजय राऊतांना मिळणार नाही. मागील वेळेस राष्ट्रवादीला संधी मिळाली. आता काँग्रेसला उमेदवारी मिळावी, यासाठी हर्षवर्धन सपकाळ प्रयत्नशील आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना संधी मिळते का, हे आधी पहा अशा शब्दात बन यांनी त्यांना चांगलेच डिवचले.
विरोधकांचे संख्याबळ पाहता विधान परिषदेत एकाच जागी तुमचा उमेदवार निवडून येऊ शकतो. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत नेमके काय केले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. कधीतरी अमावस्या-पौर्णिमेला विधान परिषदेत यायचे आणि जनतेचा एकही प्रश्न मांडायचा नाही, अशा पद्धतीची त्यांची कारकीर्द होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंना परत एकदा महाविकास आघाडी संधी देते का हे ही पहावे लागेल, असे बन म्हणाले.
लाडक्या बहिणीविरोधात सातत्याने उबाठा गट आणि महाविकास आघाडी भूमिका घेते. लाडक्या बहिणीचे पैसे बंद करा अशी मागणी करून संजय राऊतांनी आपली महिलाविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे. लाडक्या बहिणीला सन्मान निधी मिळतो आणि त्या माध्यमातून लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर सन्मानाने जगताहेत आणि तुम्ही मागणी करताहात की लाडक्या बहिणींचे पैसे बंद करा. या लाडक्या बहिणी तुम्हाला माफ करणार नाहीत. विधानसभेला लाडक्या बहिणींनी तुम्हाला हात दाखवला. महापालिकेला लाडक्या बहिणीने तुम्हाला तुमची जागा दाखवली. आगामी काळातही संजय राऊतांना आणि उबाठा गटाला लाडक्या बहिणी माफ करणार नाहीत. कारण लाडक्या बहिणीच्या विरोधात जे जातात त्यांना धडा शिकवण्याचे काम यापूर्वी महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी केले आहे. आता संजय राऊतांची वेळ आहे, असे बन यांनी सुनावले.