spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कमिशनखोरीतून जमिनी लाटणारे संजय राऊत हे ‘मॅन ऑफ कमिशन’

– भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई :- कमिशनखोरीच्या धंद्यातून सर्वसामान्यांच्या जमिनी लाटणारे पगारी नेते खा. संजय राऊत हे ‘मॅन ऑफ कमिशन’ आहेत. कोणाकोणाकडून कमिशन घेऊन अलिबाग मध्ये संजय राऊत यांनी 10 प्लॉट्स खिशात घातले याचा सातबारा दाखवत भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी हल्लाबोल केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या विकासाचे मिशन हाती घेऊन राज्याचा कायापालट करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मॅन ऑफ मिशन’ असल्याचे ते म्हणाले. अटल सेतु, कोस्टल रोड यासारखे अनेक विकास प्रकल्प हाती घेत राज्याच्या विकासाचा आलेख देवेंद्रजी यांनी उंचावला. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र हित आणि विकासाची दृष्टी आहे तर दुसरीकडे राऊत आणि उबाठा गटाची खंडणी आणि कमिशन वर नजर आहे या शब्दांत बन यांनी राऊत आणि उबाठा गटावर शरसंधान साधले.

बावळटपणा आणि खुळचटपणा अडीच वर्षांत कोणी केला हे जनतेला माहिती आहे असे म्हणत बन यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. बावळट मुख्यमंत्री कोण ? ही स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे यांचा पहिला क्रमांक लागेल अशी खोचक टिप्पणी करत खिल्ली उडवली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत जेमतेम अडीच दिवस मंत्रालयात जाणारे, कोवीड काळात मध्ये घरात बसून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून फुटकळ सल्ले देणारे तत्कालिन मुख्यमंत्री हे बावळटपणाचे शिलेदार आहेत असेही ते म्हणाले. याउलट देवेंद्रजींच्या निर्णायक नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना तीन वेळा कौल दिला आहे.

देवेंद्र फडणवीसवर राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत बन म्हणाले की देवेंद्र फडणवीस कंजुष नाहीत तर दिलदार आहेत. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली कर्जमाफी करणे आणि सातबारा कोरा करून शेतक-याला आधार देणे याला दिलदारपणा म्हणतात. याउलट अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील दौ-यात “माझे हात रिकामे आहेत” असे वक्तव्य करणारे उद्धव ठाकरे हे कंजुष आहेत. उद्धव यांच्या फसव्या कर्जमाफीची दमडीही मिळाली नाही असे शेतक-यांनी ठाकरे यांच्या तोंडावर सांगितले होते असेही बन यांनी नमूद केले.

दसरा मेळाव्यात शेतक-यांच्या मदतीबाबत ब्र देखील उद्धव यांनी काढला नाही 

दसरा मेळाव्यात पूरग्रस्त शेतक-यांच्या मदतीबद्दल ब्र देखील काढण्याचे सौजन्य उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाकडे नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना तौक्ते वादळाच्या वेळी घोषित केलेल्या मदतीपैकी नुकसानग्रस्त शेतक-याला एक रुपयाही प्रत्यक्षात मिळाला नव्हता, असेही बन म्हणाले.

मलिदा खाण्याची परंपरा राऊत, उबाठा गटाची आहे असा प्रहार करत बन यांनी राऊतांवर पलटवार केला. कोट्यवधींचा मलिदा खाणा-यांनी 12 हजार कोटींवर बोलूच नये. मविआ सरकार असताना दररोज 100 कोटींची वसुली करत तब्बल 9.5 लाख कोटींचा मलिदा तसेच कोवीड काळात खिचडी घोटाळा करून मविआ आणि उद्धव ठाकरे यांनी मलिदा फस्त केला होता. राऊतांनी पत्राचाळीत 1500 कोटींचा मलिदा खाल्ला. उद्धव ठाकरे यांनी कोरोनामध्ये जवळच्या बिल्डरांना 12 हजार कोटींची खैरात वाटत महापालिका तिजोरीवर डल्ला मारला होता याचीही आठवण बन यांनी करून दिली.

राऊतांनी कोणाकोणाला ब्लॅकमेल करून लुटले याचा हिशोब आमच्याकडे

नाशिकचे संपर्कप्रमुख असताना याच राऊतांनी टोळीच्या माध्यमातून नाशिकमध्ये खंडणी वसूल करत नाशिककरांना लुटण्याचे काम केले होते. सामना दैनिकाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून राऊत यांनी कोणाकोणाला लुटले याचा संपूर्ण हिशोब आमच्याकडे आहे, तुमचे सातबारे देखील आमच्याकडे आहेत त्यामुळे राऊतांनी वायफळ बडबड आणि आरोप करू नयेत असा इशारा बन यांनी दिला.

Popular Articles