Home Latest News सोवर एक्स्प्लोझिव्ह स्फोटात दुसरा बळी, उपचारादरम्यान निकेश इरपाचीचा मृत्यू

सोवर एक्स्प्लोझिव्ह स्फोटात दुसरा बळी, उपचारादरम्यान निकेश इरपाचीचा मृत्यू

0
70

नागपूर ८  : बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड या आयुध निर्माणीत झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्फोटात मयूर गणवीर या पहिल्या कामगाराचा मृत्यू झाला होता, तर आता निकेश इरपाची यांचाही जीव गेला आहे.

बुधवारी मध्यरात्री १२.३४ वाजता झालेल्या स्फोटात २६ कामगार जखमी झाले होते. त्यापैकी निकेश इरपाची यांच्यावर नागपूरमधील दंदे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या स्फोटात अजूनही १८ कामगारांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये हिमांशू पंचभाई, सिद्धार्थ डोंगाने, प्रभात जयश्रा, सचिन सरोदे, रवींद्र मिश्रा, योगेंद्र सिंग, सन्नी कुमार, सुरेश डोसेवार, अरुण कुमार, सूरज बिटणे, बादल माणिकपुरे, प्रतीक तिवारी, नीरजकुमार सातरघाडगे, आशिष तुमडाम, प्रेम सिंग, देवानंद रेवतकर, चंद्रेश भारती, रोहित चांगदेकर यांचा समावेश आहे. त्यापैकी सूरज कुमार, प्रभात जयश्रा आणि योगेंद्र सिंग हे अद्यापही आयसीयूत आहेत.

या दुर्घटनेनंतर कंपनीचे कामकाज सध्या बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने अद्याप मृत कामगारांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.

स्फोटाच्या वेळी आग लागल्यामुळे काही कामगारांना प्लांटच्या बाहेर पडण्यास वेळ मिळाला. हा स्फोट इतका तीव्र होता की, बाजारगाव, शिवा आणि सावंगासह जवळपासच्या १० गावांनाही त्याचा हादरा बसला. स्फोटाच्या आवाजाने घाबरून हजारो लोक घराबाहेर पडले. या स्फोटामुळे कंपनीच्या लाखो रुपयांच्या उपकरणांचे आणि साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोट झाला तेव्हा रात्री ११ नंतरच्या शिफ्टमधील कामगार स्फोट झालेल्या इमारतीपासून २०० मीटर अंतरावर असलेल्या प्रयोगशाळेत काम करत होते.