spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे विठ्ठलनगरच्या ३४ ज्येष्ठांना निःशुल्क शेगाव दर्शन

नागपूर :- अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले शेगाव दर्शन अखेर विठ्ठलनगर येथील ज्येष्ठ नागरिकांचे साकार झाले. ज्येष्ठ नागरिक समिती, विठ्ठलनगर-१, नागपूर येथील ३४ ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या निःशुल्क वाहनसेवेचा लाभ घेत शेगाव येथे जाऊन श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.१० वाजता छत्रपती चौक, नागपूर येथून ज्येष्ठ नागरिकांचा समूह शेगावकडे रवाना झाला. दुपारी २.४५ वाजता सर्वजण शेगाव येथे पोहोचले. त्यानंतर सर्व ज्येष्ठ नागरिकांनी श्री संत गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रितपणे वेळ घालवत भजन, गाणी आणि विविध आठवणींना उजाळा दिला. आनंदी वातावरणामुळे प्रवासाचा थकवा जाणवला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१० वाजता शेगाव येथून नागपूरकडे परतीचा प्रवास सुरू करण्यात आला. या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांनी भजन व गाणी म्हणत आनंद लुटला. त्यामुळे नागपूर कधी आले हेच कळले नाही, अशी भावना ज्येष्ठांनी व्यक्त केली. परतीच्या प्रवासात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीस्थळालाही ज्येष्ठ नागरिकांनी भेट देऊन दर्शन घेतले. या संपूर्ण प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे हास्य दिसून येत होते.

वाहनचालक अविनाश झंझोटे यांनी वाहन सुरळीत आणि सुरक्षितपणे चालवत सर्व ज्येष्ठ नागरिकांना सुखरूप नागपूर येथे पोहोचविले. त्यांच्या सुरक्षित व आरामदायी वाहनचालकाबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हा शेगाव दर्शन प्रवास यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक समितीचे अध्यक्ष प्रेमदास नंदनवार, उपाध्यक्ष केवलराम पटोले, सचिव प्रमोद झुरमुरे, सहसचिव विनायक सेलुकर, कोषाध्यक्ष शामराव गोमासे तसेच सदस्य नरेंद्र त्रिवेदी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या निःशुल्क शेगाव दर्शनाचा लाभ माधव भेंडारकर, पुष्पा काळे, केशव वाकोडीकर, मोरेश्वर सिंरसे, योगिराज ठाकूर, शालिग्राम मडावी, मारोतराव पावडे, मंगला कावळे, यशोदा पोंगडे, अरुण घोरमाडे, अरुण परचंड, लिलाधर क्षीरसागर, यशवंत उमरेडकर, छबू लोहकरे, आशा तवणे, भुजाडे, राजकुमार देशकर, रेखा देशकर, विनायक आसटकर, राजू मेश्राम, मनोहर मडघे, नारायण माने, राम लांडे, अरुण आसरे, विठ्ठलराव कावळे यांच्यासह अन्य ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांचे दर्शन घडवून आणण्या बरोबरच त्यांना एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली ही निःशुल्क सेवा ज्येष्ठांसाठी विशेष आनंददायी ठरली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.