spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ड्रग्स तस्करीला राजाश्रय हे शरद पवार गटाचेच पाप

– भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची घणाघाती टीका

मुंबई :- तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी जोपर्यंत शरद पवारांच्या गटात होता तोपर्यंत तो धुतल्या तांदळासारखा होता आणि त्याने भाजपामध्ये प्रवेश करताच लागलीच खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळत आहे असा टीपेचा सूर लावला आहे. अशा तक्रारी करायच्या झाल्या तर शरद पवारांच्या गटातील नेते आणि कार्यकर्त्यांबद्दल तक्रारी करणारी पत्रे लिहायला कागद कमी पडतील अशी खोचक टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी केली. ज्याच्यावर आज सुप्रिया सुळे टीका करत आहेत तो आरोपी कालपर्यंत शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होता याचा सोईस्कर विसर पडला असाही घणाघात बन यांनी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणातील जामीनावर असलेल्या एका आरोपीच्या भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या प्रवेशावर उच्चरवात टीका करणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार करत बन म्हणाले की ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे’ असे सुळे यांचे आहे. भाजपा कुठल्याही आरोपीचे समर्थन करत नाही. तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही याची खात्री बाळगा.

पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी निष्पक्ष चौकशीसाठी सरकार कटिबद्ध

पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन केली असून, चौकशी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही आणि त्यांना याची कल्पनाही नव्हती असे स्पष्ट केले आहे. निष्पक्ष चौकशीसाठी हे सरकार कटिबद्ध असून एका महिन्यात चौकशी अहवाल येईल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल असे बन यांनी नमूद केले. हा व्यवहार आधीच रद्द करण्यात आला असल्याने या प्रकरणावर पडदा पडलेला आहे असेही ते म्हणाले.

“काँग्रेसचे सरकार असताना मुंबईत घराबाहेर पडणेही धोकादायक होते”

दिल्लीत बॉम्बस्फोट झाला मात्र गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी बिहारचा प्रचार अधिक महत्त्वाचा होता अशी बिनबुडाची टीका करणाऱ्या नाना पटोलेंना लक्ष्य करत “काँग्रेसचे सरकार असताना मुंबईत घराबाहेर पडणेही धोकादायक होते ” या शब्दांत बन यांनी जोरदार प्रहार केला. कधीही कुठेही बॉम्बस्फोट होत होते. पण आज देश सुरक्षित हातांमध्ये आहे. गेल्या 10-11 वर्षांत दिल्लीत अशी दुर्दैवी घटना पहिल्यांदा घडली असून या बॉम्बस्फोटाच्या मुळाशी जाऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर गृहमंत्री अमित शाह निश्चित कारवाई करतील असा विश्वास बन यांनी व्यक्त केला. बॉम्बस्फोट झाल्यानंतर अमित शाह यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन जखमींची आणि मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली, सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि चौकशीचे आदेश दिले. ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचे गृहमंत्री हे कपडे बदलण्यात व्यस्त होते हे देशवासीयांच्या अजूनही स्मरणात असून नाकर्तेपणामुळे अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता असा टोमणाही बन यांनी मारला. नाकर्त्या आणि असंवेदनशील काँग्रेस सरकारच्या काळात सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाल्याची आठवणही बन यांनी करून दिली. दोषींना वाचवणे नाही, तर शिक्षा देणे हेच एनडीए आणि महायुती सरकारचे धोरण आहे. दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सक्षम असल्याचेही त्यांनी नमूद केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.