– बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलनाचा इशारा
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगावबांध (विशेष प्रतिनिधी):- रामपुरी, खांबी, सिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी आणि नवेगावबांध परिसरात पुरवले जाणारे अशुद्ध व दूषित पाणी थांबवून स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गोंदिया जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
यापूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता (नवेगावबांध) यांच्यामार्फत निवेदन देऊन प्रशासनाला समस्येची जाणीव करून देण्यात आली होती. मात्र, आठवडाभराचा कालावधी उलटूनही ३० हून अधिक गावांमधील पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. ऐन सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
त्यातच नवेगावबांध परिसरात पुरवले जाणारे पाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अशुद्ध असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र धरणे आंदोलन छेडले जाईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदन सादर करताना शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल, उपजिल्हाप्रमुख राजू पटेल, तालुकाप्रमुख मोरेश्वर सौदंरकर, विभाग प्रमुख कृष्णा चांदेवार, युवासेना तालुकाप्रमुख ओमराज कोल्हे, शाखाप्रमुख मुकेश चापेकर आणि कार्यालय प्रमुख वैभव कुंभरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





