हंसराज भंडारा :- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव स्थिर असतानाही देशात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज, ३ जून रोजी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथे जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसैनिकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. “मोदी सरकार मुर्दाबाद”, “दरवाढ रद्द करा”, “जय भवानी-जय शिवाजी” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
जनतेची लूट थांबवा: संजय रेहापडे
आंदोलनाचे नेतृत्व करताना जिल्हाप्रमुख संजय रेहापडे म्हणाले की, मागील दोन महिन्यांपासून दर आठ दिवसांनी इंधन दरवाढ केली जात आहे. २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव ११० ते ११२ डॉलर प्रति बॅरल होते, तेव्हा पेट्रोल ७० रुपये आणि सिलिंडर ४२५ रुपयांना मिळत होते. आज कच्च्या तेलाचे भाव जवळपास तेवढेच असताना पेट्रोल ११० रुपयांच्या पार (इथेनॉल मिश्रित असूनही) आणि सिलिंडर ९७५ रुपयांना विकले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार ‘व्हॅट’ (VAT) आणि इतर करांच्या माध्यमातून जनतेची उघड लूट करत आहे.
सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. कडक उन्हात सामान्य जनता गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपावर रांगा लावून उभी आहे, तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान परदेश वारीत मग्न आहेत. महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.
पंतप्रधानांनी आता स्वतःच्या ‘मन की बात’ सांगणे थांबवून जनतेच्या मनातील ‘जन की बात’ ऐकावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संजय रेहापडे यांच्यासह जिल्हा संघटक लवकुश निर्वाण, उपजिल्हाप्रमुख किशोर तलमले, तालुकाप्रमुख तिलक सर्वे, प्रमोद मेश्राम, मधु बुराडे, दिनेश नंदपुरे, शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, शहर समन्वयक ईश्वर टाले, उप तालुकाप्रमुख गुरुदेव साकुरे, राजू नान्हे, निलेश चामट, चित्रांगंद सेलोकर, हर्षल टेंभुरकर, अनिरुद्ध गाढवे, सोमेश्वर सेलोकर, अतुल मिरासे, जितेंद्र हरकंडे, राज वधवानी, गोपीचंद गोमासे, भोजराज भेंडारकर, मिरज बडवाईक, सुनील सूर्यवंशी, सुनील बडवाईक, भगवान कोवेकर यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.



