– ३१ हजार विद्यार्थ्यांना मागे टाकत पटकावला ‘ऑल इंडिया रँक १’ | विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा
हंसराज भंडारा :- जिद्द, चिकाटी आणि अहोरात्र मेहनतीच्या जोरावर भंडाऱ्याच्या मातीने पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. भंडारा येथील डॉ. नमीरा सिद्दीकी यांनी ‘नीट एमडीएस’ (NEET MDS) या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेत संपूर्ण देशातून प्रथम क्रमांक (All India रँक 1) पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या यशाने केवळ भंडारा जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण विदर्भाची मान अभिमानाने उंचावली आहे.
३१ हजार परीक्षार्थींमध्ये मारली बाजी देशभरातील ३१ हजार ४०७ दंत चिकित्सकांनी ही परीक्षा दिली होती. यामध्ये डॉ. नमीरा यांनी ९६० पैकी ८०२ गुण मिळवून देशात सर्वोच्च स्थान प्राप्त केले. त्यांनी वानाडोंगरी (हिंगणा) येथील स्व. दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालयातून आपले बीडीएस पूर्ण केले. २ मे २०२६ रोजी पार पडलेल्या या परीक्षेत नमीरा यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची आणि परिश्रमाची पावती आहे.
दिवसाला केवळ ३ तासांची झोप! हे यश मिळवणे सोपे नव्हते. इंटर्नशीप पूर्ण करतानाच नमीरा यांनी या परीक्षेची तयारी सुरू केली होती. दिवसा महाविद्यालयाची जबाबदारी आणि रात्री ग्रंथालयात अभ्यास, असा त्यांचा दिनक्रम होता. २४ तासांपैकी त्या केवळ दोन ते तीन तास झोप घ्यायच्या. त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांनी वडील मो. गालिब सिद्दीकी (जे भंडाऱ्यात सुपर मार्केट चालवतात) आणि कुटुंबाच्या पाठिंब्याला दिले आहे.
मौलाना आझाद कॉलेज, दिल्ली डॉ. नमीरा यांना आता दिल्लीच्या नामांकित मौलाना आझाद दंत महाविद्यालयातून पुढील शिक्षण पूर्ण करायचे आहे. वैद्यकीय व्यवसायाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “रुग्ण जेव्हा डॉक्टरकडे येतो, तेव्हा तो मोठ्या आशेने आणि विश्वासाने येतो. या विश्वासाला तडा जाऊ न देता, माणुसकी आणि दयाळूपणे रुग्णांची सेवा करणे हेच माझे ध्येय असेल.”
“देशातून पहिली येणे हा माझ्यासाठी आनंदाचा परमोच्च क्षण आहे. कष्टाचे फळ नक्की मिळते, यावर माझा विश्वास आहे. भविष्यात एक संवेदनशील डॉक्टर म्हणून गरजूंची सेवा करायची आहे.” – डॉ. नमीरा सिद्दीकी (ऑल इंडिया टॉपर)



