– कबुली मिळाल्यानंतर सूचनापत्रावर सोडले
– दुसरा मोठा गुन्हा उघडकीस
कामठी, ता.प्र 25:- कळमना रोड, बालाजी कॉलनी, रनाळा येथील असिम ट्रेडर्स या बिल्डिंग मटेरियल सप्लाय दुकानात झालेल्या ६० हजार रुपयांच्या चोरीचा तपास नविन कामठी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री दुकान बंद करताना ड्रॉवरमध्ये ६० हजार रुपये ठेवले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी गेल्यावर शटर वाकलेले आढळले. आतमध्ये पाहता रोख रक्कम चोरीस गेलेली दिसून आली.
तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील संशयितांचा शोध घेतला. कळमना हद्दीत कारवाई करताना संशयित आरोपी शिवांग नितीन फाये (१९) यास अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या दोन साथीदारांचे नावे सांगितले. त्यापैकी दोन्ही आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना सूचनापत्र देऊन सोडण्यात आले. शिवांग फाये यास न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत डांबण्यात आले आहे.
याशिवाय, अप. क्र. ४७२/२०२५ कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) भा.दं.वि. अंतर्गत सुरू असलेल्या तपासात देखील महत्त्वपूर्ण यश पोलिसांना मिळाले आहे. गुप्त बातमीच्या आधारे या प्रकरणात गुरप्रितसिंग भाटिया, मोहम्मद मिराज मोहम्मद सलीम अंसारी (दोघे अटक) यांचा सहभाग उघडकीस आला असून तिसरा आरोपी आसिफ बेच (२८, रा. यशोधरानगर, नागपूर) हा सध्या फरार आहे. कारवाईमुळे शहरातील इतर काही चोरीचे गुन्हे देखील उघडकीस आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर तपास पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, अपर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (उत्तर) दाभळे, पोलीस उपआयुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपासाची सूत्रे सपोनि सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली सफौ बिरजुचंद उईके, पोहवा नरेश खरकबान, पोशि नसीम अंसारी, पोशि राहुल वाघमारे, पोशि नितेश नवघडे व महिला चामपोशि प्राची यांनी हाताळली.




