लसीकरण अभियानाला उत्तम प्रतिसाद : अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आढावा
नागपूर ता २६ : नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचे लसीकरण व उपाययोजनांच्या अनुषंगाने गुरुवारी (ता. २४) टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी आढावा घेतला. यावेळी शहरी क्षेत्रात नियमित लसीकरणामध्ये उल्लेखनीय वाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्तांच्या सभाकक्षामध्ये आयोजित टास्क फोर्स समितीच्या बैठकीमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुलभा शेंडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. अतीक खान, डॉ. अश्विनी निकम, पीएचएन अर्चना खाडे उपस्थित होते.
प्रारंभी जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी लसीकरण मोहिमेतील आकडेवारी सादर केली. शहरी भागात लसीकरणाची आकडेवारी वाढल्याचे डॉ. मोहम्मद साजीद यांनी स्पष्ट केले. मनपाद्वारे शून्य ते ५ वर्षापर्यंत बालकांना तसेच गरोदर मातांना विविध प्रकारचे लसीकरण केले जाते. या लसींपासून कुणीही माता आणि बालक वंचित राहू नये हे मनपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी मनपाला लायन्स क्लबने विशेष फिरते लसीकरण वाहन उपलब्ध करुन दिले आहे. या वाहनामार्फत जोखीमग्रस्त भागात जाऊन लसीकरण करण्यापासून सुटलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण केले जाते. या वाहनाच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२५ पर्यंत जोखीमग्रस्त भागातील ५६२ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील चमूद्वारे देखील त्यांच्या केंद्राच्या क्षेत्रातील जोखीमग्रस्त भागात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भेट देऊन लसीकरणापासून सुटलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण केले जाते. मनपा आरोग्य विभागाच्या या प्रयत्नांमुळे शहरी भागातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
फिरते लसीकरण वाहनाच्या माध्यमातून व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील चमुद्वारे लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याचे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी दिले. बांधकाम स्थळे, झोपडपट्टी भागांमध्ये जाऊन तेथील पात्र बालकांना लसीकरण करणे, जास्तीत जास्त ठिकाणी जाऊन वंचित बालकांचे लसीकरण करण्याची गती वाढविणे, झोन अंतर्गत खासगी प्रसूतीगृहांमध्ये जन्म झालेल्या बालकांची माहिती घेणे तसेच नियमित त्या प्रसूतीगृहांच्या संपर्कात राहण्याबाबत देखील त्यांनी निर्देशित केले.
‘स्टॉप डायरिया’ अभियान अंतिम टप्प्यात
नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे २ जून ते ३१ जुलै २०२५ या कालावधीमध्ये ‘स्टॉप डायरिया’ अभियान रविण्यात येत आहे. हे अभियान अंतिम टप्प्यात असून या अभियानाच्या माध्यमातून शहरातील विविध भागात मनपा आरोग्य विभागाची चमू विविध भागात भेट देते व अतिसार झालेल्या ० ते ५ वर्ष वयाच्या बालकांचा शोध घेऊन त्यांना झिंक व ओआरएस चे वितरण केले जाते.
गोवर-रुबेला अभियानाला उत्तम प्रतिसाद
केंद्र सरकारद्वारे डिसेंबर २०२५ पर्यंत गोवर-रुबेलाचे १०० टक्के निर्मुलन करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून त्यादृष्टीने विशेष अभियान राबविण्यात येत आहे. जून २०२५ पासून सुरु झालेल्या या अभियानाला नागपूर शहरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शहरात ५७ गोवर-रुबेला चे संशयित रुग्ण आढळले होते चाचणीनंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शहरात सद्यस्थितीत गोवर-रुबेला आणि पोलिओ चे एकही रुग्ण नाही. गोवर-रुबेला संपूर्ण निर्मूलनासाठी मनपाद्वारे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जोखीमग्रस्त भागात अभियान राबविण्याबाबत नियोजन केले जाते व शेवटच्या आठवड्यातील गुरुवारी लसीकरणापासून सुटलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण केले जाते.
टीडी लसीकरणासाठी पुढे या
धनुर्वात (टीटॅनस) आणि घटसर्प (डिप्थीरिया) या आजारांपासून संरक्षणासाठी १० आणि १६ वर्ष वयोगटातील मुलांना टीडी हे इंजेक्शन देणे अनिवार्य आहे. हे इंजेक्शन घेतल्यानंतर ताप येतो त्यामुळे अनेक मुले इंजेक्शन घेण्यास नकार देतात आणि पालक देखील मुलांच्या टीडी लसीकरणासाठी तयार नसतात, ही गंभीर बाब आहे. टीडी लसीकरण हा नियमित लसीकरणाचा एक भाग असून मुलांच्या आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने हे इंजेक्शन आवश्यक आहे. टीडी इंजेक्शन मनपाचे सर्व दवाखाने, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपलब्ध असते. वर्षभरात कधीही हे इंजेक्शन घेता येते त्यामुळे पालकांनी जागरूक होऊन आपल्या पाल्यांना १०व्या आणि १६ वर्षी टीडी चे इंजेक्शन देण्यासाठी मनपा दवाखाने किंवा यूपीएससी मध्ये घेऊन यावे, असे आवाहन देखील यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी दिले.




