spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गाव छोटे… पण संस्कारांची उंची मोठी! बोरी(घिवारीत) तान्हा पोळ्यानिमित्त चिमुकल्यांसाठी अनोखा उपक्रम

किशोर साहू, मौदा :- गाव लहान असले तरी इच्छाशक्ती मोठी असेल, तर विकासासोबतच संस्कार आणि संस्कृती जपणारे सुंदर उपक्रमही घडू शकतात, याचा प्रत्यय गट ग्रामपंचायत बोरी (घिवारी) येथे तान्हा पोळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अनोख्या उपक्रमातून आला.

गावातील चिमुकल्यांना आपल्या परंपरा, संस्कृती, बैलांप्रती असलेले प्रेम आणि शेतकरी बांधवांच्या कष्टांची जाणीव व्हावी, या उद्देशाने सरपंच विशाल मदन सेलोकर यांच्या पुढाकारातून तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांसाठी नंदी सजावट व पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.

विशेष म्हणजे सहभागी झालेल्या प्रत्येक बालगोपालाला प्रोत्साहन म्हणून टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट नंदी सजावट व आकर्षक वेशभूषा करणाऱ्या चिमुकल्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषेत आणि सुंदर सजविलेल्या नंदींसह मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला नायब तहसीलदार अनिल भगत, अरोली पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार सागर गोमासे, भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, कोदामेंढीचे उपसरपंच गोपाल गिरमेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक, वडीलधारी मंडळी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी चिमुकल्यांचे कौतुक करत पारंपरिक सणांमधून पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची आणि शेतकऱ्यांच्या जीवनाची ओळख करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

सरपंच विशाल सेलोकर यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. “फक्त विकासकामे करणे नव्हे, तर गावातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन संस्कार, शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणे हेही ग्रामविकासाचे महत्त्वाचे अंग आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

छोटे गाव, मर्यादित साधने; मात्र मोठी स्वप्ने आणि त्याहून मोठी इच्छाशक्ती या विचारातून बोरी गावाने तान्हा पोळ्याच्या निमित्ताने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

उपक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक आणि सहभागी बालगोपालांचे सरपंच विशाल सेलोकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.