राज्यशास्त्र विभागात “स्वयंरोजगार आणि उद्योजकता” कार्यशाळा
नागपूर ८ : उद्योजकतेतून समाज परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूरचे हेमंत वाघमारे यांनी केले. महाराष्ट्र उद्योजकता विकास उपकेंद्र, नागपूर यांचा सहकार्याने तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागात “स्वयंरोजगार आणि उद्योजकता” एक दिवसीय कार्यशाळा मंगळवार दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडली. या कार्यशाळेत वाघमारे मार्गदर्शन करत होते.
माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर यांनी भूषविले, तर मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूरचे हेमंत वाघमारे यांची उपस्थिती होती. युवकांनी रोजगार घेणारे न होता रोजगार देणारे बनावे, असे पुढे बोलताना वाघमारे म्हणाले. प्रत्येक तरुणाने आपल्या कल्पकतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर व्यवसाय उभारला, तर समाजात सकारात्मक बदल घडवून येईल, असे वाघमारे यांनी सांगितले. आपल्या व्याख्यानात त्यांनी उद्योजकतेतील संधी, व्यवसाय नियोजन, शासकीय योजनांचा लाभ, नवउद्योजकांसाठी आवश्यक कौशल्ये आणि आव्हानांचा सामना करण्याचे मार्ग त्यांनी स्पष्ट केले. आजच्या काळात युवकांनी फक्त नोकरीच्या शोधात न राहता स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर उद्योगधंदे उभारून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणे गरजेचे आहे.“युवकांनी रोजगार घेणारे न होता रोजगार निर्माण करणारे व्हावे, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर भारत’ शक्य होईल. उद्योजकता ही केवळ उपजीविकेचे साधन नसून समाजाला नवी दिशा देणारे साधन आहे, असे ते म्हणाले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभूळकर यांनी अध्यक्षीय भाषणात नवउद्योजकता ही समाज परिवर्तनाची खरी किल्ली असल्याचे सांगितले. रोजगार निर्मिती बरोबरच सामाजिक जबाबदारी पार पाडणारा उद्योजक समाजाला विकासाच्या मार्गावर नेत असतो, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेचे संचालन प्रा. प्रमोद काणेकर यांनी केले तर प्रा. किशोर नैताम यांनी आभार मानले. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक विद्यार्थ्यांनी “आम्हाला रोजगाराच्या शोधाऐवजी रोजगार निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली” अशा प्रतिक्रिया दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील प्रा. प्रज्ञानंद माटे, प्रा.अतुल मुन, प्रा. किशोर पाटील, प्रा. रायन महाजन, प्रा.प्रियंका गावंडे, प्रा. सचिन चापेके इत्यादींचे सहकार्य लाभले.




