सभापती महेश चकोले यांच्याकडून गुढी उभारून नववर्षाचे उत्साहात स्वागत

0
40

सावनेर प्रतिनिधी :- हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवणारा गुढीपाडवा सण सावनेर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येणारा हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. वर्षातील चार प्रमुख मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करण्यास विशेष महत्त्व आहे.

सावनेर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा पाणी पुरवठा विभागाचे सभापती महेश चंद्रप्रकाश चकोले यांनी आपल्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत केले. यावेळी गुढी सजवण्यासाठी रेशमी वस्त्र, तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने तसेच बत्ताशांची माळ यांसारख्या नैसर्गिक व आरोग्यदायी घटकांचा वापर करण्यात आला.

चकोले परिवाराने गुढीपूजन करून विष्णु सहस्रनाम पठण केले आणि आनंदमय वातावरणात नववर्षाचे स्वागत केले. या प्रसंगी चंद्रप्रकाश चकोले, रमा चकोले, कोमल चकोले, स्मित चकोले व गाथा चकोले उपस्थित होते.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने परिसरातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून नागरिकांनी नववर्ष एकमेकांना शुभेच्छा देत साजरे केले.