· वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकीचा संगम
मुंबई :- पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींना गती देणारा हा मार्ग आता ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे नव्या उंचीवर पोहोचत आहे. केवळ वाहतूक सुलभ करण्यापुरता मर्यादित न राहता, हा प्रकल्प राज्याच्या व्यापक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा हा महामार्ग दररोज हजारो वाहनांची वाहतूक सांभाळतो. मात्र, बोरघाट परिसरातील तीव्र वळणे, चढ-उतार, पावसाळ्यातील दरडी कोसळण्याचे प्रकार आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही वर्षानुवर्षे मोठी समस्या राहिली. या अडचणींवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची संकल्पना पुढे आली आणि २९ ऑगस्ट २०१८ रोजी या महत्त्वाकांक्षी योजनेला शासनाची मंजुरी मिळाली. सुमारे ६६९५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प भौतिकदृष्ट्या पूर्ण झाला आहे.
पार्श्वभूमी : समस्येतून उपायाकडे
अडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट हा मार्ग सध्या सहा पदरी असला तरी येथे दहा पदरी वाहतूक एकत्र येते. घाटातील अवघड भौगोलिक परिस्थितीमुळे अनेकदा वाहतुकीचा वेग मंदावतो. विशेषतः पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका वाढतो आणि काही लेन बंद कराव्या लागतात. यामुळे वेळेचा अपव्यय, अपघातांची शक्यता आणि आर्थिक नुकसान वाढते. या पार्श्वभूमीवर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा एक पर्यायी, अधिक सुरक्षित आणि सरळ मार्ग म्हणून उभारण्यात आला आहे.
प्रकल्पाचे स्वरूप : अंतर कमी, वेळ वाचणार
या प्रकल्पाअंतर्गत खोपोली ते कुसगाव दरम्यान नवीन सरळ मार्ग तयार करण्यात आला आहे. एकूण १९.८४ कि.मी. लांबीच्या या मार्गात ५.८६ कि.मी. अंतरावर जुन्या रस्त्याचे सहा पदरीवरून आठ पदरीकरण करण्यात आले आहे, तर उर्वरित १३.३ कि.मी. पूर्णपणे नवीन मार्ग आहे. या नव्या मार्गामुळे प्रवासाचे अंतर सुमारे ६ किमीने कमी होणार असून, २० ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.
अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद
मिसिंग लिंकमुळे भारतातील पहिला एक्सप्रेस-वे आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होत आहे. मिसिंग लिंकसह वेळ आणि इंधन वाचविणारा सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. मिसिंग लिंक जगातील सर्वात रुंद बोगदा (२३.५ मीटर) असून लोणावळा तलावाच्या १८० मीटर खालून खोदलेला बोगदा आहे. या ठिकाणी ६५० मीटर केबल-स्टेड ब्रिजसह भारतातील सर्वात उंच सत्यावरील पूल पायलॉन उंची (१८२मीटर) असून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वांत रुंद बोगदा म्हणून नोंद झालेली आहे.
हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या घटवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मोठी सुधारणा होणार आहे.
मिसिंग लिंक’ प्रकल्प हा आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. या प्रकल्पात दोन समांतर बोगदे (१.६४ कि.मी. आणि ८.९२ कि.मी.), भव्य व्हायाडक्ट, यांचा समावेश असून, वाहनांचा वेग १२० कि.मी. / तास ठेवण्याची सुविधा या मार्गावर उपलब्ध आहे.सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान
या प्रकल्पात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. बोगद्यांमध्ये वॉटर मिस्ट अग्निशमन प्रणाली, स्कॅडा आधारित नियंत्रण, एएनपीआर कॅमेरे, व्हाइस इव्हॅक्यूएशन सिस्टिम, आधुनिक वायुवीजन व्यवस्था आणि एसओएस सुविधा बसवण्यात आल्या आहेत. या सर्व प्रणालींमुळे अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.
मिसिंग लिंकची व्यापक उपयुक्तता
‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे अनेक महत्त्वपूर्ण लाभ अपेक्षित आहेत. प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार असून, घाटातील धोकादायक वळणे टाळल्याने अपघातांचे प्रमाण घटेल. वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरळीत होईल. इंधनाच्या वापरात घट होऊन दररोज सुमारे १ कोटी रुपयांची बचत होईल, अशी अपेक्षा आहे. एकूणच, हा प्रकल्प प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि किफायतशीर बनवणार आहे.
कठीण परिस्थितीतही यश
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अनेक तांत्रिक आणि नैसर्गिक आव्हानांचा सामना करावा लागला. डोंगराळ भागात बोगदे खोदणे, घनदाट वनक्षेत्रात काम करणे, मुसळधार पावसामुळे होणारे अडथळे, तसेच बोगद्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा आणि सुरक्षा व्यवस्थापन ही मोठी आव्हाने होती. याशिवाय कोविड-१९ महामारीमुळे आणि काही तांत्रिक चाचण्यांसाठी परदेशी संस्थांवर अवलंबून राहावे लागले मात्र या सर्व अडचणींवर मात करत प्रकल्प यशयशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.
विकासाच्या दिशेने मोठे पाऊल
मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा केवळ एक रस्ता नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन आणि दृष्टीकोन यांचा संगम आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. भविष्यात हा प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. महामार्ग हे कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेचे रक्तवाहिनीसारखे असतात. मुंबई आणि पुणे ही दोन प्रमुख आर्थिक केंद्रे जोडणारा हा मार्ग उद्योग, आयटी, उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्रासाठी जीवनदायिनी भूमिका बजावतो. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे या दोन शहरांमधील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असल्याने व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे.
दळणवळण सुविधांचा विस्तार
या प्रकल्पामुळे केवळ दोन शहरांमधील अंतर कमी होत नाही, तर संपूर्ण प्रदेशातील दळणवळण सुविधांचा दर्जा उंचावतो. खोपोली, लोणावळा, कुसगाव यांसारख्या परिसरांना अधिक चांगली जोडणी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि अर्धशहरी भागांपर्यंतही विकासाच्या संधी पोहोचतील. आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या सुविधा अधिक सहज उपलब्ध होतील.
पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्था
मुंबई–पुणे मार्ग हा पर्यटनासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. लोणावळा, खंडाळा यांसारख्या पर्यटनस्थळांना या मार्गामुळे अधिक वेगाने पोहोचता येईल. परिणामी पर्यटन वाढून स्थानिक व्यवसाय, हॉटेल उद्योग आणि सेवा क्षेत्राला चालना मिळेल. स्थानिक रोजगारनिर्मितीतही वाढ होईल.
शाश्वत आणि संतुलित विकास
वाहतुकीचा प्रवाह सुरळीत झाल्यामुळे वाहनांची गर्दी कमी होईल आणि इंधनाचा वापरही घटेल. यामुळे पर्यावरणावर होणारा ताण कमी होण्यास मदत होईल. नियोजनबद्ध पायाभूत सुविधा विकासामुळे हा प्रकल्प शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरतो. मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा केवळ प्रवास सुलभ करणारा रस्ता नसून, राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा महामार्ग आहे. आर्थिक वाढ, दळणवळण सुधारणा, सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन या सर्व बाबींचा समतोल साधत हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिणार आहे.
– वंदना रघुनाथराव थोरात, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मंत्रालय.

