नागपूर :- नवरात्री उत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिकेने शहरातील दुर्गा मंडळाकरिता विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दुर्गा देवी मंडाळाच्या परिसराची नियमित स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक झोनमधील संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वासूमना पंत यांनी या संबंधित आदेश निर्गमित केले आहे.
आदेशानुसार, मनपाच्या घनकचरा विभागाद्वारे नियुक्त केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी दुर्गा मंडळाच्या परिसराची दुपारी ४ ते रात्री १२ या वेळेत साफसफाई केली जाणार आहे. याव्यतिरिक्त, सकाळी ६ ते दुपारी २ या नियमित वेळेतही स्वच्छता करण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित जमादारांनी त्यांच्याकडील दुर्गा मंडळांच्या परिसराची स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रकारे करवून घ्यावी, स्वच्छता निरीक्षकांनी आपल्या प्रभागातील कामाचे नियोजन करून त्यावर नियंत्रण ठेवावे, सर्व झोनल अधिकारी व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या झोनमधील सर्व दुर्गा मंडळांच्या परिसरातील स्वच्छतेवर बारकाईने लक्ष ठेवून वाहनांचे योग्य वाटप करावे, सहाय्यक आयुक्तांनी या कामात येणाऱ्या अडचणी दूर करून स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे,असे आदेशात नमूद केले आहे.




