Ø जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक
Ø विविध विभागाच्या योजनांचा घेतला आढावा
यवतमाळ :- केंद्र शासनाच्यावतीने अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा. विकासकामे करतांना अनावश्यक विलंब होऊ नये तसेच कामे गुणवत्तापुर्वक करा, असे निर्देश खा.संजय देशमुख यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष खा.देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, यांच्यासह इतर विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

यावेळी खासदार देशमुख यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. विविध योजनेची अपूर्ण विकासकामे तत्काळ पुर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले. कृषी, पंचायती राज मंत्रालय, आवास, अटल नवीकरण व शहरी परिवर्तन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण, महिला व बाल विकास विभागाचे बालगृह, बाल विवाह, भुमी व संसाधन विभाग आदी विभागांशी निगडीत कामकाजाची माहिती घेत निर्देश दिले.
बैठकीत प्रत्येक विभागाने आपल्याकडील योजनांची सद्यस्थिती, प्रगती अहवाल व अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सादर केल्या. त्यावर खासदार संजय देशमुख यांनी सखोल चर्चा करत सूचना दिल्या. प्रधानमंत्री घरकुल योजनेची घरे पुर्ण करण्यासोबतच जिल्ह्यात डेयरी व्यवसाय कसा वाढता येईल याबाबत त्यांनी संबंधित विभागास निर्देश दिले.
काही योजनांचा निधी वितरण, निविदा प्रक्रिया आणि प्रशासकीय मंजुरीमध्ये होणाऱ्या अडथळ्यांवर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी विविध विभाग प्रमुखांनी कामकाजाची सद्यस्थिती सादर केली. काही अडचणी, निधीची मागणी व आवश्यक सहयोग यावरही चर्चा झाली. केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या असल्याचे या योजना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने राबविण्याचे निर्देश खा.देशमुख यांनी दिले.




