spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंदोलन व आजच्या परिस्थितीवर नागपुरात विशेष चर्चा संपन्न

– ऑल इंडिया आंबेडकर महासभेतर्फे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- ऑल इंडिया आंबेडकर महासभा (पंजी) यांच्या वतीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंदोलन व आजची परिस्थिती’ या विषयावर विशेष चर्चा व मार्गदर्शन शुक्रवारी हिवरीनगर येथील तथागत बुद्ध विहारात करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि संविधानिक मूल्यांचा आजच्या सामाजिक परिस्थितीशी संबंध जोडत आंबेडकरी चळवळीची सद्यस्थिती, तिच्यासमोरील आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत धम्म प्रचार संघाचे अध्यक्ष दिलीप रामटेके होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून समता, बंधुता आणि न्याय हे आंबेडकरी आंदोलनाचे मूलभूत धोरण असल्याचे सांगितले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी तसेच संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरी विचारांची व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व ऑल इंडिया आंबेडकर महासभेचे अध्यक्ष राकेश बहादूर यांनी शिक्षित होऊन संघटित राहण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना देशभर पोहोचविण्या साठी ऑल इंडिया आंबेडकर महासभा सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळीची ताकद संघटित समाजात असून, सामाजिक परिवर्तनासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महासभेचे महासचिव सरदार अमरिक सिंह बांगर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची जाणीव ठेवून चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

बाबासाहेबांनी समाजाला शिक्षण, संविधानिक अधिकार आणि समानतेचा मार्ग दिला असून, त्यांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महासभेच्या कोषाध्यक्ष रीना गावस्कर वाल्मिकी यांनी आंबेडकरी चळवळीत महिलांचा सक्रिय सहभाग वाढविण्याची गरज व्यक्त केली. महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक जागृतीसाठी आंबेडकरी आंदोलनाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती तुमसरचे माजी सभापती कलाम शेख यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून रीवा, मध्य प्रदेशचे आदिवासी नेते छोटू कौल, हैदराबाद (तेलंगणा) येथील अँड. नानूर गोपाल तसेच ऑल इंडिया आंबेडकर महासभा, पंजाबचे प्रदेशाध्यक्ष निर्मलजीत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संविधानिक मूल्यांचे महत्त्व आणि वर्तमान सामाजिक परिस्थितीत या विचारांची उपयुक्तता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आंबेडकरी चळवळीसमोरील सध्याची आव्हाने, समाजातील विविध घटकांना संघटित करण्याची गरज आणि भविष्यातील चळवळीची दिशा याबाबत मान्यवरांनी विचार मांडले. या कार्यक्रमाचे संचालन असलम खातमी यांनी तर सचिव सत्यवान मेश्राम यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला समजून घेण्यासाठी आणि वर्तमान परिस्थितीवर विचारमंथन करण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, उपासक व आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल मोरे, नरेंद्र मेश्राम, शिशुपाल रामटेके, गुलाब पाटील, अरविंद रंगारी, सिद्धार्थ नानवरे, वसीम कुरेशी, जयदेव चिवंडे, विनोद घरडे, शोएब शेख, विश्वनाथ लोखंडे, नंदा डोंगरे, छाया नाईक, आम्रपाली पानतावणे, सुमती लोखंडे, डॉ. बाळा रंगारी, सुरेश पाटील, राजू मेश्राम, मंगेश वाट, भिक्षुक देशपांडे, बंडू शेंडे, ममता कांबळे आणि सावित्री मेश्राम यांच्यासह अनेक उपासकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजक असलम खातमी व राहुल मोरे यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

Popular Articles