spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आरोग्य विभागासोबतच्या आढावा बैठकीत शाळांतील स्वच्छता व्यवस्थेवर विशेष भर

– शिक्षण सभापतींनी घेतला शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांची उपलब्धता व शौचालय स्वच्छतेचा आढावा

– स्वच्छ, सुरक्षित व सुस्थितीत शाळांसाठी निर्देश

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विशेष समितीच्या सभापती संतोषदेवी लढ्ढा यांनी आरोग्य विभागासोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेऊन शहरातील मनपा शाळांमधील स्वच्छता व हायजीनची स्थिती तपासली.

या बैठकीस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त  राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, उपशिक्षणाधिकारी सीमा खोब्रागडे, विभागीय स्वच्छता अधिकारी सागर हारगुडे, शिक्षण विभागाचे  विनय बगले तसेच सर्व झोनचे स्वच्छता अधिकारी व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान सभापती लढ्ढा यांनी शाळांमधील सफाई कर्मचाऱ्यांची उपलब्धता, त्यांची कार्यपद्धती तसेच शौचालयांच्या नियमित व प्रभावी स्वच्छतेची स्थिती याचा सविस्तर आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता व अनुकूल शैक्षणिक वातावरणासाठी शाळांमधील स्वच्छता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्या शाळांमध्ये सफाई कर्मचारी अपुरे आहेत किंवा उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी तातडीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सर्व शाळांमधील शौचालयांची नियमित, वेळेवर व प्रभावी स्वच्छता सुनिश्चित करण्यास सांगितले, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण भासणार नाही.

सभापतींनी स्पष्ट शब्दांत सांगितले की कोणत्याही शाळेत अस्वच्छता किंवा निष्काळजीपणा अजिबात सहन केला जाणार नाही. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नियमित तपासणीद्वारे प्रत्येक शाळा स्वच्छ, सुरक्षित व सुस्थितीत राहील याची खात्री करावी तसेच कोणतीही शाळा दुर्लक्षित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच अधिकाऱ्यांना नियमित शाळा भेटी घेऊन स्वच्छतेवर सतत देखरेख ठेवण्याचे व आवश्यक सुधारात्मक उपाय तत्काळ राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Popular Articles