सचिन चौरसिया, रामटेक :- रामटेक-तुमसर मार्गावरील शिरपूर फाट्याजवळ दुचाकीला ट्रकनी जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, पती रोशन दिलीप चौधरी व मुलगी रिया चौधरी जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.१७) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार रामटेक-तुमसर मार्गावरील शिरपूर फाट्याजवळ दुचाकीला भरधाव ट्रकची धडक लागल्याने नम्रता रोशन चौधरी (वय २६, रा. मांद्री) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती रोशन दिलीप चौधरी व मुलगी रिया चौधरी जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १७) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. रोशन चौधरी हे एमएच ४० बीयू ६०३० क्रमांकाच्या दुचाकीने पत्नी व मुलीसह रामटेकवरून मांद्रीकडे जात होते. शिरपूर फाट्याजवळ रामटेककडे जाणाऱ्या एमपी ०९ एचजी ७५७२ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात नम्रता चौधरी ट्रकखाली आल्याने त्यांच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रकसह फरार झाला. जखमींवर रामटेक उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून रामटेक पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे.