spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवास दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

– सांस्कृतिक कार्यक्रमांसह खाद्य, कला व खरेदी दालनांवर झुंबड

नवी दिल्ली :- राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री गणरायाच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविकांची उपस्थिती लाभत असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सदनात उभारण्यात आलेली खाद्य, कला व प्रदर्शन-विक्री दालने नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

‘चव महाराष्ट्राची!’ अंतर्गत पुरणपोळी व उकडीचे मोदक, ‘कौशल्याला सलाम!’ उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू तसेच ‘महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा अनोखा ठेवा’ या उपक्रमातील पैठणी, माहेश्वरी व इरकल साड्यांच्या दालनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

याशिवाय महिला बचत गटांनी तयार केलेले चकली पीठ, ढोकळा पीठ, बारीक शेव, शेवभाजीसाठीची शेव आणि फराळी चिवडा तसेच वडापाव, चादरी आणि बांबू टॉवेल यांसारख्या विविध वस्तूंची प्रदर्शनी-विक्रीही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या उपक्रमातून महिला बचत गटांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळत आहे.

गेल्या काही दिवसांतील यशस्वी कार्यक्रमांनंतर आता 20 सप्टेंबरपासून होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांकडे रसिकांचे लक्ष लागले आहे. 20 सप्टेंबर रोजी जनपथ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर येथे वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे आणि शरयू दाते यांच्या उपस्थितीत ‘मराठी चित्रपट गीते’हा संगीत सोहळा रंगणार आहे. 21 सप्टेंबर रोजी ‘पाक कलाकृती स्पर्धा’आणि साध्वी जेठवानी यांचा ‘भरतनाट्यम’ नृत्य कार्यक्रम होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी राजेंद्र क्षीरसागर प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 23 सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगभवन येथे प्रमिला लोदगेकर प्रस्तुत ‘लावणी’ कार्यक्रम, तर 24 सप्टेंबर रोजी मोनिका कपूर प्रस्तुत ‘बॉली बीट्स’ हिंदी-मराठी गायन व नृत्य सोहळा होणार आहे.

गणेशोत्सवाची सांगता 25 सप्टेंबर रोजी होणार असून, दुपारी 3 ते सायंकाळी 7.30 या वेळेत जुन्या महाराष्ट्र सदनातून झांज पथकासह श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. उत्सवातील सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, काही मोजक्या कार्यक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे.

राजधानीतील महाराष्ट्रप्रेमी, गणेशभक्त आणि रसिकांनी महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवाला आवर्जून भेट देऊन श्रींचे दर्शन घ्यावे तसेच खाद्य, कला, संस्कृती आणि खरेदीच्या या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.