spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी उपजिल्हा रुग्णालयात मानसिक आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

– ६७४ नागरिकांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी; १४२ जणांची मानसिक आरोग्य तपासणी — पथनाट्य, पोस्टर व रांगोळी स्पर्धांतून जनजागृती

कामठी :- जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात १० ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, बाह्यरुग्ण विभागात एकूण ६७४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४२ नागरिकांची मानसिक आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे, नागरिकांमधील गैरसमज दूर करणे आणि गरजूंना वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या उपक्रमांतर्गत आशा नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मानसिक आरोग्याचे महत्त्व प्रदर्शित केले. तसेच शाळेत पोस्टर स्पर्धा आणि शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या विविध उपक्रमांच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निशात शेख आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील विविध पथकांनी सहभाग घेतला. जिल्हा मानसिक आरोग्य पथक, जिल्हा उपशामक उपचार पथक, एचडब्ल्यूटीसीचे डॉक्टर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आशा नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, आशा सेविका, परिचारिका आणि उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य केले.याप्रसंगी

जिल्हा मानसिक आरोग्य पथकाच्या डॉ. स्नेहल, जिल्हा उपशामक उपचार पथकाच्या डॉ. स्वाती व डॉ. पुरवाली, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. शबनम खानुनी आणि डॉ. हिमांशू यांच्यासह परिचारिका आयेशा सिस्टर व शंभरकर मॅडम उपस्थित होत्या.

याप्रसंगी शल्य चिकित्सक डॉ एन बी राठोड यांनी  मानसिक आरोग्य हा सर्वांगीण आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. मानसिक तणाव, चिंता किंवा इतर मानसिक समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा शिबिरांमुळे नागरिकांना तपासणीची संधी मिळण्याबरोबरच मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने संवाद साधण्यास प्रोत्साहन मिळते. कामठीतील या शिबिराच्या माध्यमातून आरोग्य विभागाने मानसिक आरोग्य जनजागृतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.असल्याचे मौलिक मत व्यक्त केले.

Popular Articles