Ø सहा हजार पेक्षा जास्त प्रकरणे निकाली, चार जोडप्यांचा संसार सावरला
यवतमाळ :- जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ९ मे रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीस वकील व पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये साडेसहा हजार पेक्षा जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले.तसेच चार जोडप्यांचा संसार सावरण्यात आला. निकाली निघालेल्या प्रकरण्याचे एकूण 9.92 कोटीपैक्षा जास्त मुल्य होते.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. ९ मे २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शेखर चु. मुनघाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नंदेश शं. देशपांडे,आभासी पद्धतीने उपस्थित होते. त्यांनी लोकअदालतीचे महत्त्व विशद करत पक्षकार व विधिज्ञांना अधिकाधिक प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-१, एस. यू. बघेले, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे दिपक एच. दाभाडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, पी. एस. इंगळे, सचिव, जिल्हा वकील संघ, मोहन गिरटकर, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयात प्रलंबित तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. विविध राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था आणि इतर संस्थांची वादपूर्व प्रकरणेदेखील लोकअदालतीसमोर मांडण्यात आली. प्रकरणे आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी शेखर चु. मुनघाटे तथा दिपक एच. दाभाडे आणि त्यांच्या सहकारी न्यायाधीशांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी वेळोवेळी शासकीय अधिकारी, वकील, पक्षकार, विविध संस्था तसेच बँकांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन लोकअदालतीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या प्रयत्नांना यश मिळून यवतमाळ जिल्ह्यातील १२५२ प्रलंबित प्रकरणे व ५४३५ वादपूर्व प्रकरणे अशी एकूण ६६८७ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकूण तडजोड मूल्य रुपये ९,९२,१०,८६२ इतके होते. विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध न्यायालयांतून ५६४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच या लोकअदालतीत ०४ विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या जोडप्यांचा संसार पुन्हा सुरळीत करण्यात यश आले.
राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तसेच तालुका विधी सेवा समित्यांनी अथक परिश्रम घेतले. यासाठी जिल्हाधिकारी, यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, उपजिल्हाधिकारी, यवतमाळ, भू-अर्जन अधिकारी, बेंबळा प्रकल्प, विविध सहकारी बँका, विमा कंपन्या, पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, वकील संघ, स्वयंसेवक तसेच अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आर. जे. काझी, आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.