-‘स्वीप’ मोहिमेअंतर्गत शहरात विविध उपक्रमांचे आयोजन
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत शहरातील मनपा आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून मतदान जागरुकतेसाठी प्रयत्न केले जात आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, वैष्णवी बी. स्वीप प्रमुख व उपायुक्त(स.वि.वि) डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्या मार्गदर्शनात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शाळा स्तरावर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मतदान जनजागृतीचा विषय घेऊन मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धा घेतली जात आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. विविध शाळांमध्ये पथनाट्य, पोवाडा गायन आणि रांगोळी, निबंध, चित्रकला स्पर्धा आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. त्याचबरोबर रॅलीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
स्वामी विवेकानंद मनपा हिंदी माध्यमिक शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी माध्यमिक शाळा आणि टायनी टॉट हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृती अभियानात भाग घेतला. शंकर नगर येथील मूकबधिर शाळेत आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. मीनल सांगोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “लोकशाही बळकट करण्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आणि दिव्यांग नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे,” असे आवाहन डॉ. सांगोळे यांनी यावेळी केले.




