– बसच्या नियोजनाअभावी २०० हून अधिक विद्यार्थ्यांना मनस्ताप
सचिन चौरसिया, रामटेक :- तालुक्यातील देवलापार येथील शाळांमध्ये परिसरातील १५ ते २० गावातुन २०० हून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत दोन ब्ल्यू बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, बसच्या नियोजनाअभावी विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर तब्बल दोन तास नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर बसची प्रतीक्षा करावी लागते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देवलापार येथे दररोज दोन बसेस धावतात. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत सोडल्यानंतर या बसेस शाळेजवळच उभ्या असतात. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर मात्र एका बसला अनेक गावांचा फेरा मारावा लागतो. शाळा सुटल्यानंतर एक बस निमटोला, कडबीखेडा, सावरा, नवेगाव, बांद्रा, मानेगाव, करवाही, दुलारा ते छवारी आदी गावांचा फेरा करते. सुमारे (२० किमी) अशा मार्गाने जाते. दुसरी बस वडांबा, जुनेवाणी, उमरी, बेलदा, मार्गाने फेरा पूर्ण करून आल्यानंतर पुढील प्रवाशांना घेऊन रामटेककडे रवाना होते. त्यामुळे शाळा साडेचार वाजता सुटुनही अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनींना साडेसहा-सात वाजेपर्यंत घरी पोहोचावे लागते.
भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका
देवलापार बसस्टॉप नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. महामार्गालगतच्या बसस्टॉपवर प्रवासी निवारा नसल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर प्रवाशांना उन्हात-पावसात रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. बसची प्रतीक्षा करताना काही विद्यार्थी रस्त्याच्या कडेला, त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांची संख्या व गावांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त बस सुरू करावी, मार्गनिहाय बसफेऱ्यांचे योग्य नियोजन करावे तसेच देवलापार येथे सुरक्षित प्रवासी निवारा उभारावा, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.





