कोदामेंढी 1 : निमखेडा येथील विश्रांती कॉन्व्हेंट स्कूल येथे डॉ. विश्रांती खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आलेल्या ३० दिवसीय उन्हाळी शिबिराचा नुकताच उत्साहात समारोप करण्यात आला. या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध कलात्मक, बौद्धिक व शारीरिक विकास साधणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होता आले.
शिबिरादरम्यान डान्सिंग, संगीत, कराटे, इंग्रजी संभाषण, स्टोरी टेलिंग तसेच क्राफ्ट मेकिंग यांसारखे उपक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सृजनशीलता व संवाद कौशल्य यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला.
शिबिराच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या कला-कौशल्याचे सादरीकरण करत सर्वांची मने जिंकली. पालक व शिक्षकांनीही या उपक्रमांचे मन:पूर्वक कौतुक केले. शाळेच्या व्यवस्थापन समितीमधील शांता खांडेकर व प्रणय नरेलवार यांनी यापुढेही असे शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.
या शिबिराचे यश हे शिक्षक, प्रशिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले असल्याचे शाळेच्या प्राचार्यां बिंदू तागिरीसा यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षिका रीना दारोडे, लतिका झाडे, रक्षक खांडेकर तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.




