आश्चर्य! मृत झालेली म्हातारी अचानक झाली जिवंत

0
59

– १०३ वर्षाच्या गंगाबाईच्या ‘मृत्यूसह जिवंत होण्याच्या’ चर्चेला उधाण 

– मृत्यु आणि जन्मामध्ये मध्ये १ दिवसांचे अंतर

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- देव तारी त्याला कोण मारी? अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच मृत व्यक्ती जिवंत झाल्याच्या घटना घडल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. अशीच एक घटना आंबेडकर वार्ड रामटेक येथे घडली. येथे मृत्यू झालेल्या एका म्हातारी आजीचा अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंबीयांनी केली. तिची अंत्ययात्रा काढणार अचानक तिच्या मृतदेहाची हालचाल झाली. तब्बल दोन महिन्यापासून बेडरेस्ट असलेल्या तथा पाण्यावर जीवन जगत असलेल्या म्हातारीच्या जीव गेला, अन अवघ्या दोन तासातच अचानक म्हातारीने पाय हलवले आणि म्हातारी जिवंत असल्याचे समजतात येथे एकच गोंधळ उडाला. आंबेडकर वार्डातील गंगाबाई सावजी साखरे (वय १०३) वर्ष असे म्हातारीचे नाव असून मुळच्या चारगाव येथील रहिवासी, त्या रामटेक येथे आपल्या मुलीकडे राहत होत्या. या घटनेबाबत रामटेक नगर परिषद चे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी वार्ताहर चे लक्ष वेधून वार्ता वाऱ्यासारखी पसरली. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाबाई ह्या तब्बल दोन महिन्यापासून बेडवर असून पाणीवर त्या जीवन जगत होत्या. (दि.१२) जानेवारीला सायं.पाच वाजता अचानक गंगाबाईच्या शरीराच्या अवयवांच्या हालचाल बंद पडल्या व त्या मृत झाल्याचे लक्षात आले. कुटुंबांनी अंत्यविधीच्या प्रक्रियेला सुरुवात केली नातेवाईकांना फोनवर माहिती देण्यात आली. सोशल मीडियावर निधनाची वार्ता पसरविण्यात आली. गंगाबाईला नवीन लुगडं घालण्यात आले, त्यांचे हाताची व पाहिजे बोटे बांधल्या गेली , नाकात कापूस कोंबण्यात आला. मंगळवार (दि.१३) जानेवारीला सकाळी दहा वाजता अंत्ययात्रेच्या वेळ ठरला. अंगणात शोकमंडप उभा राहिला, खुर्य्या मांडल्या गेल्या, अंत्यविधीचे साहित्य कोपऱ्यात ठेवले गेले. एका कोपऱ्यात पांढऱ्या वस्त्रात निश्चल पडलेले शरीर आणि दुसऱ्या कोपऱ्यात डोळे पुसत उभे असलेले नातेवाईक. सोशल मीडियावर निधनाच्या बातम्या झळकत होत्या, दूरदूरचे नातेवाईक अंत्यविधीसाठी निघाले होते. पण नियतीला काहीतरी वेगळेच लिहायचे होते. अंत्यसंस्काराच्या तयारीत असतानाच, गंगाबाईने आपली पायाची बोटी हलवली गंगाबाईच्या नातू राकेश साखरे यांच्या लक्षात येताच त्यांनी हाताची व पायाची बांधलेली बोटे सोडायला लावली व नाकात कोंबलेला कापूस काढताच गंगाबाईने जोराने श्वास घ्यायला लागली. क्षणात घरात गोंधळ उडाला. अश्रुंनी भरलेले डोळे आनंदी झाले. म्हणूनच देव तारी त्याला कोण मारी…!

मृत्यु आणि जन्मामध्ये मध्ये १ दिवसांचे अंतर

मृत्यूला ही मात देणारी गंगाबाई यांच्या १३ जानेवारीला वाढदिवस. अंत्ययात्रेसाठी जम्मू-कश्मीर, बालाघाटसह ठिकाणाहून गंगाबाईच्या अंत्ययात्रेसाठी निघालेले नातेवाईक रामटेक ला पोहोचले. काय पाहता आजी मरणाच्या दारातून आश्चर्यजनकरित्या परत आली. हा दिवस नातेवाईकांनी नवजीवन साजरा केला. १०३ वर्षाची आजी गंगाबाई साखरे यांना निसर्गाने दिलेला दुसरा श्वास आहे.