पांढरकवडा :- नगर परिषदेची अत्यंत महत्त्वाची पहिली आमसभा मंगळवार, १२ जानेवारी रोजी दुपारी नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनू बोरले यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या आमसभेस मुख्याधिकारी पंकज गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगर परिषदेच्या नव्या कार्यकाळातील ही पहिलीच आमसभा असल्याने शहरवासीयांचे विशेष लक्ष या सभेकडे लागले होते.या आमसभेत उपाध्यक्षपदासाठी अतिष तानाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोणताही विरोध न होता त्यांची निवड जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यासोबतच नगर परिषदेतील स्वीकृत सदस्यपदासाठी एकूण दोन सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. भारतीय जनता पार्टीकडून श्रीराम विश्वनाथ मेलकेवार तर शिवसेना शिंदे गटाकडून स्वप्निल विलासराव उप्पलवार यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.निवडीनंतर नवनिर्वाचित उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांचा उपस्थित मान्यवर, नगरसेवक व नागरिकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी समर्थकांसह शहरातून विजय मिरवणूक काढत जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. या मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.विशेष बाब म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेले स्वप्निल उप्पलवार हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुका अध्यक्ष असून अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. तसेच खेतानी फाउंडेशनचे सर्वेसर्वा सलीम खेतानी यांचेही ते निकटवर्तीय आहेत. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील स्थानिक पातळीवरील युती, निवडणुकीच्या काळातील जोमदार कामगिरी, शिवसेना कोअर कमिटीतील समर्थकांचे मतदान तसेच ना. संजय राठोड यांच्या विश्वासूंच्या मार्गदर्शनामुळे त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याची चर्चा आहे.या निवडीमुळे पांढरकवड्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र आश्चर्य व्यक्त केले जात असून आगामी काळात नगर परिषदेतील राजकीय समीकरणे कशी आकार घेतील, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.



