spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘डेटा-ड्रिव्हन’ नियोजनातून राज्याचा शाश्वत विकास – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

मुंबई :- राज्याच्या धोरणनिर्मितीचा कणा असलेल्या सांख्यिकी विभागाचा डेटा केवळ संकलनापुरता मर्यादित न राहता, तो राज्याच्या गतीमान आणि कालमर्यादित विकासासाठी प्रभावीपणे वापरला गेला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.

मुंबई मेट्रो विकास प्राधिकरण, वांद्रे येथे आयोजित २० व्या  ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन-२०२६’ च्या मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मित्राचे मुख्य डेटा अधिकारी (चीफ डेटा ऑफीसर) प्रवीण श्रीवास्तव, अर्थ व सांख्यिकी आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार, विशेष आयुक्त  कृष्णा फिरके यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘डेटा ड़्रिव्हन’ योजना काळाची गरज

यावेळी बोलताना राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या योजना या डेटा-ड्रिव्हन (आकडेवारीवर आधारित) असणे काळाची गरज आहे. डेटा संकलन आणि त्याचा प्रत्यक्ष धोरणनिर्मितीत होणारा वापर यात सांगड घालून उद्दिष्टाधारित कामाचा आराखडा जास्त परिणामकारक ठरणारा आहे. जिल्हा व तालुका निहाय डेटा संकलनाचा प्राधान्यक्रम ठरवून त्याचा एक भक्कम रोडमॅप आयुक्तालयाने तयार करावा, त्याच्या आधारे  शासनाला अचूक धोरणनिर्मिती, कार्यक्रम आखणी करण्याच्या कामात त्याचा निश्चितच व्यापक फायदा होईल,” असे राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले. सांख्यिकी व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी सामूहिक सहकार्य करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

सांख्यिकी व्यवस्थेची गुणवत्ता आणि विश्वासार्हता

मित्राचे मुख्य डेटा अधिकारी प्रवीण श्रीवास्तव म्हणाले की, सांख्यिकी माहिती इतकी मजबूत असायला हवी की, तिला कोणीही आव्हान देऊ शकणार नाही. तसेच ‘डेटा क्वालिटी ऑडिट’ करण्यावर भर दिला गेला पाहिजे. तंत्रज्ञान आणि प्रगत डेटाबेस पॉलिसीच्या माध्यमातून सांख्यिकी विभाग अधिक सक्षम करण्याबाबत त्यांनी यावेळी प्रशासनाला प्रोत्साहित केले.

आर्थिक नियोजनासाठी अचूक आकडेवारीचे महत्त्व

प्रवीण परदेशी म्हणाले की, केवळ बचतीचे प्रमाण वाढवून विकास साध्य होत नाही, तर उत्पादकता, ऊर्जा कार्यक्षमता आणि गुंतवणुकीची परिणामकारकता यांसारख्या घटकांचे विश्लेषण महत्त्वाचे असते. सर्व शासकीय सांख्यिकीय अहवला व आकडेवारी खुले ‘ओपन सोर्स’ आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिल्यास संशोधक, अर्थतज्ञ  व विद्यार्थ्यांच्या विश्लेषणातून नवे निष्कर्ष मांडू शकतील. त्यातून देशाच्या व राज्याच्या  धोरणनिर्मितीस अधिक सशक्तता आणि व्यापकता  येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष आयुक्त फिरके यांनी केले तर आयुक्त पेडियार यांनी यावेळी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या अद्ययावत संकेतस्थळाचे उद्घाटन राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘साधना सप्ताहा’मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. यावर्षीच्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची संकल्पना ही ‘ अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेटा’ या अनुंषगाने कार्यक्रमात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.