कामठी :- कौटुंबिक नात्यांतील विश्वासाला तडा देणारी गंभीर घटना कामठीत उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीशी अयोग्य स्पर्श करून गैरवर्तन केल्याचा तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गडचिरोली येथील ५५ वर्षीय नातेवाईकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कामठीत राहते. आरोपी हा तिच्या मोठ्या बहिणीचा पती असून, दोन्ही कुटुंबांत नातेसंबंध असल्याने एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. याच कौटुंबिक परिचयादरम्यान आरोपीने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदार महिलेची मुलगी काही दिवसांपासून गुमसुम राहत असल्याचे तिच्या लक्षात आले. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने आपल्यासोबत घडलेल्या कथित प्रकाराची माहिती दिली
त्यानुसार फिर्यादीची अल्पवयीन मुलगी , १३ मे २०२६ रोजी गडचिरोली येथे आरोपीच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त गेले असताना रात्रीच्या वेळी आरोपीने अल्पवयीन मुलीशी अयोग्य स्पर्श करून गैरवर्तन केले व . या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर २५ मे रोजी आरोपी आपल्या कुटुंबीयांसह तक्रारदार महिलेच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कामठी येथे आला असताना पुन्हा गैरवर्तन केले. तसेच रक्षबांधन निमित्त आरोपी हा तक्रारदार महिलेच्या घरी कामठीत आला असता ३१ ऑगस्ट रोजी रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतरही असाच प्रकार घडल्याचे मुलीने आईला आपबिती सांगितली.
आरोपी हा जवळचा नातेवाईक असल्याने तसेच कुटुंबाची बदनामी होण्याच्या भीतीमुळे तक्रार देण्यास विलंब झाल्याचे तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले. कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केल्यानंतर २ ऑक्टोबर रोजी जुनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
या प्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेची कलमे ७५, ३५१(३) आणि पोक्सो कायदा २०१२ मधील कलमे ८ व १२ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास जुनी कामठी पोलीस करीत आहेत








