कामठी :- गोदामात आढळून आलेल्या व्यक्तीला जाब विचारल्याच्या वादातून एका फळविक्रेत्यावर दांड्याने हल्ला केल्याची घटना कामठीतील त्रिकोणी चौकाजवळील चौपाटी परिसरात घडली. गुरुवारी (१ ऑक्टोबर) रात्री घडलेल्या या घटनेत मोहम्मद परवेज कसरू जमा (वय ४४, रा. कोळसाटाल, कामठी) हे जखमी झाले. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस दुखापत झाल्याने त्यांना रॉय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी समसूद्दीन तालिब रहीम (वय अंदाजे २८, रा. तुमडीपुरा, कामठी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार जख्मि फळविक्रेता परवेज हे १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास मच्छीपूल परिसरातील कमला नेहरू शाळेजवळ फळव्यवसायासाठी वापरत असलेल्या गोदामात गेले होते. त्यावेळी तेथे आरोपी समसूद्दीन आढळून आला. ‘तू येथे काय करीत आहेस?’ अशी विचारणा परवेज यांनी केली असता, आरोपीने शिवीगाळ करून ‘तुमको देख लूंगा’ अशी धमकी दिली आणि तेथून निघून गेला, .
याच घटनेनंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास परवेज हे मोटारसायकलने त्रिकोणी चौकाजवळील चौपाटी परिसरात गेले असता, आरोपीने मागून येऊन लाकडी अथवा लोखंडी दांड्याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस प्रहार केला. या हल्ल्यात परवेज जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने रॉय रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातून प्राप्त वैद्यकीय-कायदेशीर नोंदीच्या आधारे जुनी कामठी पोलिसांनी जखमी परवेज यांचा जबाब नोंदविला. त्यानंतर आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद. मेश्राम करीत आहेत.








