हंसराज, भंडारा सिहोरा :- तुमसर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत सिहोरा येथे सन २०२३-२४ च्या २५१५ आमदार स्थानिक विकास निधीतून ‘स्वर्ग रथ’ (शववाहिका) उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून हा रथ ग्रामपंचायतीला भेट देण्यात आला.
गावामध्ये दुर्दैवी प्रसंगी नागरिकांना मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी वाहतुकीच्या समस्येचा सामना करावा लागत होता. ही गरज लक्षात घेऊन आमदार राजू कारेमोरे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून सिहोरा ग्रामपंचायतीसाठी स्वर्ग रथाची तरतूद केली होती. हा रथ उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली असून समाधान व्यक्त केले जात आहे.
या स्वर्ग रथाच्या हस्तांतरण प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच रंजू तुरकर, ग्रामपंचायत सदस्य कादर अन्सारी, ग्राम अधिकारी गभणे, दिनेश तुरकर, गरीबदास निनावे, धनु नेवारे, सुरेंद्र तुरकर, गोप कुमार घोडीचोर, अभय कामथे यांच्यासह गावातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सुविधेबद्दल ग्रामस्थांनी आमदार राजू कारेमोरे यांचे आभार मानले आहेत.





