– समाजातील एक रत्न हरपले : चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे नागपुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन स्व.डॉ चंद्रशेखर पाखमोडे यांना २५ जानेवारीला बाबूराव झाडे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आयुर्वेदिक ले आऊट सक्करदरा नागपूर येथे राज्याचे महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी त्यांच्या मातोश्री कुसुम कृष्णराव पाखमोडे, पत्नी डॉ. मनिषा चंद्रशेखर पाखमोडे, भाऊ डॉ.विजय पाखमोडे, सासरे महादेवराव गद्रे उपस्थित होते. सभेचे संयोजक व प्रांतिक तैलिकचे राज्य कोषाध्यक्ष बळवंतराव मोरघडे यांनी प्रास्ताविक तर नयना संजय झाडे यांनी संचालन केले. डॉ चंद्रशेखर पाखमोडे हे नागपुरातील न्यूरोन हॉस्पिटलचे डायरेक्टर व प्रसिद्ध न्यूरोसर्जन होते. मध्यप्रदेश, छत्तीसगड व संपूर्ण मध्य भारतात लोकांसाठी ते देव म्हणून गणल्या जायचे. गरिबांसाठी त्यांनी अत्यंत अल्प दरात, तर कधी सेवेचा, ऑपरेशनचा मोबदला न घेता सेवा दिली. पैशासाठी कोणाचीही अडवणूक केली नाही. किंवा सेवा नाकारली नाही. त्यांनी आपली वैद्यकीय सेवा ही समाजसेवा, समाजकल्याणसाठी देण्याचे निश्चित केले होते. ते न्यूरो मध्ये विद्वान व हुशार डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. अशा हरहुन्नरी, समाजसेवी डॉ.पाखमोडे यांना ३१ डिसेंबर २०२५ ऐन उमेदीच्या काळात ५३ व्या वर्षी अचानक हृदय बंद पडून स्वर्गवास झाला. याप्रसंगी बोलतांना ना. बावनकुळे म्हणालेत की, डॉ. पाखमोडे याचे अचानक जाण्यांनी सर्वच समाजातील एक अनमोल रत्न हरपले. समाजाची तसेच माझी वैक्तिक कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांचे कुटुंबीय व संपूर्ण समाज यामुळे खूप दुःखी असून त्यांची पृथ्वीवर गरज असताना देवाने त्यांना स्वर्गात कसे नेले हा अनुत्तरणीय प्रश्न सर्वांना पडलेला आहे. सर्वच समाजातील गरीब, गरजू, शेतकरी, ग्रामीण भागातील आजारी लोकांचे खूप नुकसान झाले. त्यांचे कुटुंबीय व सर्व समाज यामुळे पोरका झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रामुखाने सर्वश्री महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्यं अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे,माजी महापौर शेखर सावरबांधे, तेली समाज सभेचे अध्यक्ष नाना ढगे, आय.एम.आय. नागपूर चे अध्यक्ष डॉ. राजेश सावरबांधे, डॉ. चंद्रशेखर गील्लूरकर,डॉ.प्रमोद गिरी, नरेडको विदर्भ बिल्डर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ कुणाल पडोळे, शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे,नागपूर विभाग अध्यक्ष जगदीश वैद्य,यादव समाज सभेचे सचिव रोशन नासरे, विदर्भ बुनियादी शाळेचें संचालक संजय शेंडे, माजी शिक्षिका, इंदु बडवाईक, राम गायधने, डॉ.चेतना माकडे, कल्याणी भुरे, डॉ. शिंगणे, रमेशराव झाडे, चेतना जिभकाटे यांनी सभेत आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली दिली. तसेच सभेत मोठ्या प्रमाणावर आप्तेष्ट, मित्रपरिवार, समाज बंधू – भगिनी हजर होते. शेवटी सामूहिक श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी प्रांतीकचे नागपूर शहर अध्यक्ष किशोर भिवगडे, रमेश उमाटे, देवेंद्र काळबांडे व प्रा.अभय रेवतकर, गणेश गाडेकर, निखिल भुते, चेतन देशमुख, शहर महिला अध्यक्षा मंगला मस्के, नीलिमा वाघमारे नितीन झाडे, मुकेश मोहुर्ले, विजय पाठक, चंद्रभान मेहर, नितीन लाडे आदींनी परिश्रम घेतलेत.




