वाल्मीकि, सुदर्शन, मखियार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रतिभा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

0
2

कामठी :- आनंद बहुउद्देशीय समाज विकास संस्था तथा महालक्ष्मी रचना बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी वाल्मीकि समाज, महर्षी सुदर्शन समाज व मखियार समाजातील इयत्ता १०वी, १२वी तसेच पदवीधर गुणवंत विद्यार्थी, डॉक्टर, अभियंते, वकील तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिभा सन्मान सोहळा रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी कामठी शहरातील कुसुमताई संगेवार सभागृह येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा सतीश शेरसिंग डागोर होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगर पंचायत येरखेडा-कामठीचे अध्यक्ष राजकिरण बारवे व नगर परिषद कामठीचे बांधकाम सभापती लालसिंग यादव उपस्थित होते, प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे राष्ट्रीय महामंत्री  जयसिंग कछवाह, राष्ट्रीय वंचित वर्ग न्याय अधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास नरवाल, वाल्मीकि समाजाचे अध्यक्ष विलास झंझोटे, सुदर्शन समाजाचे चौधरी  गेंदलाल कलसे तसेच भाजप कामठी शहर महामंत्री नरेश कलसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी दोन्ही संस्थांचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र तांडेकर व रोहन बिल्लरवान उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे कार्याध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे रामटेक-नागपूर जिल्हा मंत्री  दिनेश बिल्लरवान यांनी केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोर यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ सफाई कर्मचारी व त्यांच्या मुलांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच घरकुल योजना व स्वयंरोजगार योजनांवर काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

जयसिंग कछवाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकत, समाजाने बाबासाहेबांच्या सिद्धांतांवर चालत शिक्षित व संघटित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

विकास नरवाल यांनी उपवर्गीकरणाच्या विषयावर मार्गदर्शन करताना, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाल्यास वाल्मीकि, सुदर्शन, मखियार समाजासह विविध वंचित समाजांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळण्यास मदत होईल, असे सांगितले.

विलास झंझोटे यांनी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास समाजातील ज्येष्ठ नागरिक व मान्यवर शरद टाकभवरे, बब्बू डागोर, सुरजीत चौहान, राजू बहुते, राजेश सनकत, वरिष्ठ सल्लागार शशी सारवान, सागर परोसीया,सतीश मेहरोलिया, कैलाश परदेसी, योगेश परदेसी, श्याम टाकभंवरे माजी नगरसेविका मंगला परदेसी, होमसायन्स स्कूलच्या माजी मुख्याध्यापिका  गंगा मेहरोलिया, सुदर्शन समाजाचे सरपंच मनोज मेथिया, वाल्मीकि समाजाचे सरपंच मनोहर टाकभवरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे वरिष्ठ मार्गदर्शक रूपलाल समुद्रे व  कृष्णा राणे, तसेच सामाजिक कार्यकर्ते मानव परदेसी, राजू परदेसी, निशांत बडेल, दीपक पारोचे, मनोज करोसिया, प्रीतम उज्जैनवार, शेखर बर्मन, अमित मधुमटके व रोहित बिल्लरवान यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल घोघलिया व रोहित बिल्लरवान और ऋषभ उज्जैनवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन महालक्ष्मी रचना बहुउद्देशीय संस्था की संस्थापक रचना बिल्लरवान व संस्थेचे उपाध्यक्ष शुभम तडसे यांनी केले.

या प्रतिभा सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून वाल्मीकि, सुदर्शन व मखियार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून शिक्षणाला प्रोत्साहन, समाजातील गुणवंतांचा सन्मान आणि पुढील पिढीला प्रेरणा देण्याचा संदेश देण्यात आला.