– “पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापनाचे कौशल्य आत्मसात करणारे डॉक्टरच भविष्यात समाजासाठी अधिक उपयुक्त ठरतील.” – TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड
यवतमाळ :- दि. ६ व ७ जुलै २०२६ रोजी डा. मा. म. आयुर्वेद महाविद्यालय व ल. क. आयुर्वेद रुग्णालय, यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ (आपत्ती व्यवस्थापन विभाग) यांच्या वतीने टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (TDRF) द्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (TDRF) चे संचालक तथा एन.आय.डी.एम., एन.डी.आर.एफ. (भारत सरकार), एस.डी.एम.ए., यशदा, पुणे व शासनाचे अधिकृत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षक हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड यांनी प्रशिक्षण देत मार्गदर्शन केले.

या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, सीपीआर (CPR), आपत्तीतील मानसिक आधार व काळजी (Psychological Support & Care), रुग्णालय सुरक्षा, आपत्कालीन रुग्णालय व्यवस्थापन, अग्निसुरक्षा, मदत व पुनर्वसन शिबिर व्यवस्थापन (Relief & Rehabilitation Camp Management), आपत्कालीन पूर्वतयारी व प्रतिसाद या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक विषयाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचे प्रभावी प्रशिक्षण मिळाले.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता परिस्थितीचे योग्य मूल्यमापन करणे, जखमी व्यक्तींना प्रथमोपचार देणे, सीपीआरद्वारे जीव वाचविण्याचे तंत्र, रुग्णालयातील आपत्कालीन व्यवस्थापन, आग लागल्यास सुरक्षितरीत्या स्थलांतर, तसेच मदत व पुनर्वसन शिबिरांचे नियोजन व व्यवस्थापन याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. मानसिक धैर्य, नेतृत्व, समन्वय आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रात्यक्षिकांमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त असून अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक महाविद्यालयात नियमितपणे आयोजित करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सदर प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मुंदाणे, उपप्राचार्य डॉ. बेलोरकर, TDRF चे जनसंपर्क अधिकारी तथा प्रशिक्षण अधिकारी अभिषेक राजहंस, मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सैय्यद, कार्यालय अधीक्षक सुनील महल्ले, TDRF चे संजीवनी पवार, कुणाल रणदिवे, लीना चव्हाण, राम करडे, आदित्य वासे, हर्षली कडाम, उर्वशी धकाते, गौरी उईके, नंदिनी गांजरे व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.




