spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर नगरीत उत्साहात तीज महोत्सव २०२६ संपन्न

– पारंपरिक गीत- नृत्याने रंगला तीज गौरी मातेचा उत्सव; सामाजिक एकतेसह संस्कृती जतनाचा संदेश

नागपूर :- जय सेवालाल! जगत जननी जगदंबा भवानी मातेच्या कृपेने तसेच जगद्गुरु संत श्री सेवालाल बापूंच्या प्रेरणेने नागपूर नगरीत तीज महोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक जल्लोषात संपन्न झाला. तीज महोत्सवाच्या निमित्ताने समाजातील महिला भगिनींसह समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. पारंपरिक रूढी- परंपरा, लोकसंस्कृती आणि आध्यात्मिक वारशाचे दर्शन या महोत्सवातून घडले. पद्मावती नगर येथे संत श्री सेवालाल बापूंच्या पावन झेंड्याजवळ प्रा.डी.बी.चव्हाण नायक व नितीन राठोड कारभारी यांच्या नेतृत्वाखाली तीज गौरी मातेची विधिवत पेरणी करण्यात आली होती. त्यानंतर तीज मातेच्या तीज तोडणीचा तसेच समारोपीय विसर्जनाचा कार्यक्रम महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागपूर शहरातील विविध भागांतून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तीज महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात महिला भगिनींनी तीज गौरी मातेची स्तुतीपर पारंपरिक गीते सादर केली. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी केलेल्या नृत्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. भक्तिगीते, पारंपरिक गीत- नृत्य आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण सभागृह भक्तिमय झाले होते.

महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने तीज मातेची पूजा- अर्चना करून आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी तसेच समाजाच्या मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. तीज हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजाच्या लोकपरंपरा, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव असल्याचे यावेळी दिसून आले. आधुनिकतेच्या काळातही आपल्या पूर्वजांनी जपलेल्या परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आले. विशेषतः महिला भगिनींच्या मोठ्या सहभागामुळे तीज महोत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. प्रा.डी.बी. चव्हाण नायक व नितीन राठोड कारभारी यांच्या संघटन कौशल्यातून तसेच समाजातील रूढी-परंपरा आणि आध्यात्मिक मूल्ये जपण्याच्या भावनेतून नागपूर नगरीतील बहुतांश समाज बांधव एकत्र आले. विविध भागातील समाजबांधवांनी एकत्र येत तीज महोत्सव साजरा केल्याने समाजातील एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले. या कार्यक्रमाला आत्माराम राठोड (IFS), इंजि.एन.एस. पवार, प्रा.डॉ.विजय राठोड, गणेश राठोड (उपायुक्त, NMC), रमेश आडे (उपायुक्त), प्रा. डॉ.दिलीप चव्हाण, लोबीचंद राठोड, यू. के. राठोड, प्रा. ईश्वर चव्हाण, सुरेश राठोड (उपअभियंता), विनोद जाधव (C.O.), राजदीप राठोड (संघटक, शिवसेना), रणजीत राठोड, सहदेव चव्हाण, खेमचंद चव्हाण, रामप्रसाद राठोड, मधुकर राठोड, सुरेश राठोड (BDO), विनोद राठोड (मेडिकल), ओंकार चव्हाण, नरेंद्र चव्हाण, राजेश राठोड (मेडिकल) यांच्यासह महिला भगिनी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी तीज महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील पारंपरिक संस्कृती आणि रूढी- परंपरा जतन करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या समाजाच्या परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाची ओळख होते, तसेच समाजातील एकोपा अधिक मजबूत होतो, असा सूर उपस्थितांमध्ये होता.

तीज महोत्सवाच्या निमित्ताने महिला भगिनींमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक गीतांवर आणि नृत्यावर महिला भगिनींनी आनंद व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रमस्थळी जय सेवालालच्या जयघोषासह भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परंपरा, श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा तीज महोत्सव नागपूर नगरीत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवामुळे समाजातील महिला भगिनी व समाज बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यातही अशाच प्रकारे समाजाच्या सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख सहदेव चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.