बैंकाक २५ : थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील दीर्घकालीन सीमा वाद पुन्हा एकदा तीव्र संघर्षात परिवर्तित झाला असून दुसऱ्या दिवशीही युद्धाचे पडसाद ऐकायला मिळाले. तोफगोळ्यांचा आवाज, जेट विमाने, रॉकेट लाँचर आणि जमिनीवरील टँकसह मोठ्या प्रमाणावर लष्करी हालचाली दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. या संघर्षात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये १३ नागरिक आणि १ सैनिकाचा समावेश आहे. थायलंडच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले की, सीमेलगतच्या चार प्रांतांमधून सुमारे १ लाखाहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्यासाठी सुमारे ३०० तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात आले आहेत. कंबोडियाच्या सीमेलगत असलेल्या समरांग शहरात सकाळपासून तोफांचा आवाज ऐकू येत असल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली. अनेक कुटुंबांनी सकाळी लवकर आपल्या मुलांना आणि आवश्यक सामानासह गाड्यांमध्ये भरून पळ काढला. एका रहिवाशाने सांगितले की, “गोळीबार पहाटे सहाच्या सुमारास पुन्हा सुरू झाला आणि आम्हाला जीव वाचवण्यासाठी घर सोडावं लागलं.” या संघर्षामध्ये एक रुग्णालय व पेट्रोल पंपावर झालेल्या हल्ल्याची थायलंडकडून पुष्टी झाली आहे. थायलंडने कंबोडियावर सामान्य नागरी सुविधांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर कंबोडियाने यासाठी थायलंडच्या भडकवणुकीला जबाबदार धरले आहे. ही झडप गुरुवारी सुरू झाली होती, जेव्हा थायलंडने कंबोडियाच्या राजदूताला हाकलले आणि त्यानंतर आपल्या राजनयिकांना परत बोलावले. प्रत्युत्तरादाखल कंबोडियाने थायलंडच्या सर्व राजदूतांना देशाबाहेर पाठवले आणि संबंध ‘न्यूनतम स्तरावर’ आणले. या परिस्थितीत कंबोडियाच्या पंतप्रधान हुन मानेट यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीची मागणी केली होती आणि ती बैठक आज (शुक्रवारी) आयोजित होत आहे. अमेरिका, फ्रान्स, युरोपियन संघ आणि चीन यांनी दोन्ही देशांना तातडीने युद्धविराम आणि शांततापूर्ण चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. २००८ ते २०११ दरम्यानही अशाच प्रकारे या दोन देशांमध्ये शेकडो कि.मी.च्या सीमांवर युद्ध झाले होते, ज्यात अनेकांचा मृत्यू आणि हजारोंचे विस्थापन झाले होते. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या वादात निर्णय दिला असला तरी २०२5 च्या मे महिन्यात पुन्हा एका कंबोडियन सैनिकाच्या मृत्यूनंतर हा वाद पुन्हा उफाळून आला. सध्या दोन्ही देश एकमेकांना दोष देत असून परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. जागतिक समुदायाकडून मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जात आहे आणि दोन्ही देशांनी संयम बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.








