spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सिनीयर भोसला पॅलेसमध्ये २९८ वर्षांची गणेश विसर्जनाची परंपरा कायम 

– सप्तमीच्या दिवशी पालखीतून गणरायाला निरोप; भोसलेकालीन परंपरेचा थाट यंदाही कायम 

नागपूर :- हिंदवी स्वराज्याचे विस्तारक, नागपूर राज्याचे संस्थापक सेनासाहेब सुभा श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम) यांच्या कालखंडापासून सन १७२८ पासून सुरू असलेली गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे. महाल येथील श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या सिनीयर भोसला पॅलेसमध्ये यंदा गणेशमूर्तीच्या विसर्जनानिमित्त या २९८ वर्षांच्या परंपरेचे दर्शन घडले. गणेशोत्सवाच्या सप्तमीच्या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तीची विधिवत पूजा- अर्चा करून पारंपरिक पद्धतीने पालखीतून विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली. भोसले राजघराण्याच्या ऐतिहासिक वाड्यातील हा गणेशोत्सव नागपूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. या गणरायाची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तब्बल २९८ वर्षांपासून गणेशमूर्तीचा आकार आणि रंगाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. गणरायाला नागपूरकर भोसले कालीन सिरपेज-तुरा असलेली पारंपरिक पगडी परिधान केली जाते. त्यामुळे या गणेशमूर्तीला राजघराण्याच्या ऐतिहासिक परंपरेची विशेष ओळख प्राप्त झाली आहे. गणेशमूर्तीचे आगमनही पारंपरिक पद्धतीने पालखीतून करण्यात येते आणि विसर्जनाच्या दिवशीही गणरायाला पालखीतूनच निरोप दिला जातो. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजच्या आधुनिक काळातही तितक्याच श्रद्धेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने जपली जात आहे. विसर्जनाच्या वेळी राजघराण्याची परंपरा, धार्मिक विधी आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. गणरायाला निरोप देताना उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने जयघोष केला. २९८ वर्षांची ही ऐतिहासिक परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जतन करण्याचा संकल्प यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.