spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘जय कन्हैयालाल की’च्या जयघोषाने सिहोरा नगरी दुमदुमली; श्रीकृष्ण जन्माष्टमी व विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न

सिहोरा :- सिहोरा शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव ‘जय कन्हैयालाल की, हाथी घोडा पालखी’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साई कॉलनी, आंबा टोली, गोपाळ नगर आणि बाजार चौक यांसह विविध भागांतून ढोल-ताशा आणि संदलच्या गजरात भगवान श्रीकृष्णाच्या पालख्या काढण्यात आल्या. गुलालाची उधळण करत निघालेल्या या मिरवणुका विसर्जन स्थळी पोहोचल्या. विसर्जन सोहळ्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शीतला माता मंदिर आणि विसर्जन तलाव परिसर प्रशासनातर्फे सज्ज ठेवण्यात आला होता.

उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या दहीहंडी आणि गोपाळकाल्याचे आयोजन शीतला माता समितीच्या वतीने करण्यात आले होते. दहीहंडी फुटल्यानंतर भाविकांनी गोपाळकाल्याचा प्रसाद ग्रहण केला. विसर्जन प्रसंगी नागरिकांनी शीतला माता व नाग मंदिरात ‘भुजली’ अर्पण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सर्व मतभेद विसरून नागरिकांनी एकमेकांना आलिंगन देत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले. शहरात ठिकठिकाणी उभारलेले स्वागत द्वार, तोरणे आणि बॅनरमुळे संपूर्ण सिहोरा नगरी भक्तीमय वातावरणाने सजली होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.