Home Latest News शहरातील क्रीडा मैदाने दर्जेदार करणार

शहरातील क्रीडा मैदाने दर्जेदार करणार

0
31

– क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शनी धवड यांनी घेतला आढावा

नागपूर :- शहरातील क्रीडा मैदानांचा दर्जा सुधारून खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी दर्जेदार क्रीडा मैदाने तयार करण्यात येईल, अशी माहिती मनपाच्या क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शनी धवड यांनी दिली.

महानगरपालिकेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात शहरातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आज (ता.१६) पार पडली. या बैठकीत क्रीडा विशेष समिती सभापती  दर्शनी स्वानंद धवड, उपसभापती संजय अरुणराव चावरे, क्रीडा समिती सदस्य सदस्य ज्योती अरविंद देवघरे, कल्पना विक्रम शर्मा, , ईश्वर रामकृष्ण ढंगळे,  प्रवीण हेमराज गिन्हे, शुभम शेषराव मोटरे, गौतम हरिभाऊ अंबादे आणि मो. मुजतबा मो. मुस्तफा अंसारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील खेळाडूंना भेडसावणाऱ्या समस्या तसेच क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील मैदानांची सध्याची स्थिती आणि भविष्यातील सुविधा यावर विशेष भर देण्यात आला.दिव्यांग खेळाडूंसाठी विशेष सुविधा असाव्यात आणि प्रत्येक सदस्याने आपल्या क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहित करा असे दर्शनी धवड या वेळी म्हणाल्या.

मनपा हद्दीतील सर्व खेळाची मैदाने आणि सार्वजनिक उपयोगाच्या जागांचा विकास करून त्यांना ऑलिम्पिक खेळांच्या निकषांनुसार तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुस्ती, बास्केटबॉल, तायक्वांदो, आर्चरी, सायकलिंग, पिकल बॉल आदी विविध खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. सहा विधानसभा क्षेत्रांनुसार मैदानांचे नियोजन करून जास्तीत जास्त युवक-युवतींना खेळाकडे आकर्षित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

मैदानांमध्ये दिव्याची व्यवस्था, बसण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, पार्किंग, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच डिजिटल स्क्रीन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. एकाच मैदानात ३ ते ४ खेळ खेळता येतील अशा प्रकारे मैदानांचे नियोजन करण्यात येणार आहे.

याशिवाय खेळांच्या मैदानात सिंथेटिक ग्राउंड, ओपन जिम, स्पोर्ट्स इक्विपमेंट, मुलांसाठी अॅडव्हेंचर प्ले एरिया तसेच नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक विकसित करण्यात येणार आहेत. तसेच महापौर निता ठाकरे व आयुक्त डॉ विपीन यांच्या निर्देशानुसार पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत ग्राउंड मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार पॅनेल आणि वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. निवडक मनपा शाळांमधील मैदानांचा विकास करून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ‘उडान’ योजनेअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्याबाबतही सविस्तर चर्चा ककरण्यात आली.

दिव्यांग खेळाडूंसाठी विशेष सुविधा, तसेच शाळांमध्ये उन्हाळी खेळ संबंधित प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यावर भर देण्यात आला. यासोबतच क्रीडा विभागाच्या सेवांचे डिजिटायझेशन करण्यासाठी अँप विकसित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. नागपूर शहराला क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.