spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलणार; नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांनी आखला विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन

– पदभार स्वीकारताच नगरपरिषदेत पहिली महत्त्वपूर्ण बैठक; आमदार परिणय फुके यांची प्रमुख उपस्थिती

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सौ. मधुराताई मिलिंद मदनकर यांनी तातडीने सूत्रे हाती घेत शहराच्या विकासाला गती देण्याचा निर्धार केला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी नगरपरिषदेत एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. समन्वय, नियोजन आणि सांघिक कार्य या ‘त्रिसूत्री’च्या जोरावर भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीला प्रामुख्याने विद्यमान आमदार तथा माजी पालकमंत्री परिणय फुके, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जुम्माजी प्यारे उपस्थित होते.

बैठकीत बोलताना नगराध्यक्ष मधुरा मदनकर म्हणाल्या की, “शहराचा विकास हा केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता तो नियोजनबद्ध आणि प्रभावी होणे गरजेचे आहे. नागरिकांनी जो विश्वास आमच्यावर टाकला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी प्रशासन अधिक पारदर्शक आणि जबाबदार केले जाईल.” या बैठकीत पायाभूत सुविधा, शहरातील स्वच्छता, नियमित पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून भविष्यातील विकासकामांचे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले.

या बैठकीला भंडारा नगरपरिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांची उपस्थिती लक्षणीय होती. यामध्ये भाग्यश्री कलंबे, कुलप्रीत चढ्ढा, चंद्रकला भोपे, शिवशंकर आजबले, रिता शैलेश मेश्राम, प्रिया खरोले, आशा ऊइके, निमिष डोकरीमारे, नितीन गायधने, वृषाली ब्राह्मणकर, रुपाली नेवारे, सचिन घनमारे, राजू व्यास, प्रिती ब्राह्मणकर, आशु गोंडाने, मंगेश वंजारी, प्रीती गाढवे, हाजी मुश्ताक (बल्ली), अल्फीया अमीर शेख, हरिश्चंद्र मडावी, ललित जांभुळकर, भगवान बावनकर, ज्योती हरीश मोगरे, कमल साठवणे, गजानन बादशहा, राजू धुर्वे, लक्ष्मी भागवत, विनोद चवरे, ऋतुजा पडोळे, पूजा कुंभलकर, शुभांगी खोब्रागडे, उमा घोगरे, हाजी अक्‍तरी बेगम, उषा नंदनवार आणि सुनीता उपरीकर यांचा समावेश होता.

प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील सुसंवादातून भंडाऱ्याची प्रगती निश्चितच साध्य होईल, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला. नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या या सक्रिय पुढाकारामुळे भंडारा शहरवासीयांमध्ये विकासाच्या नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.