– अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्ताने ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन
नागपूर :- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी संत, साहित्यिक, ग्रंथालये, सामान्य माणूस आदींचे मोलाचे योगदान आहे. अभिजात मराठीचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी नागपूर शहरात मराठी बोला चळवळ उभी रहावी, असे प्रतिपादन विभागीय सहायक भाषा संचालक संतोष गोसावी यांनी आज येथे केले.
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्ताने जिल्हा ग्रंथालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोसावी बोलत होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे अध्यक्षस्थानी होते. विभागीय भाषा संचालनालय कार्यालयाचे अधिक्षक संजय गोरे आणि जिल्हा ग्रंथालयाच्या प्रभारी ग्रंथपाल मिनाक्षी कांबळे उपस्थित होत्या.

गोसावी यांनी भाषेचे अभिजातपण आणि मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा याबाबत माहिती देतांना मराठी भाषेच्या गौरवशाली परंपरेवर प्रकाश टाकला. मराठी भाषेच्या अभिजाततेपर्यंतच्या प्रवासात ग्रंथालये, ग्रामीण भागातील विविध बोली व ते बोलणारी मंडळी आदींविषयी माहिती दिली. या वैभवशाली भाषेची परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याप्रमाणे नागपूर मध्येही मराठी बोला चळवळ उभारली जावी, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे आणि अधिक्षक संजय गोरे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा ग्रंथालयाच्या तांत्रिक सहायक माला राठोड सूत्रसंचालन केले तर प्रभारी ग्रंथपाल मिनाक्षी कांबळे यांनी आभार मानले. ग्रंथालय सभासद, वाचक व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.




