गोंदिया १९ : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक आणि दूध संघाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालक व अध्यक्षांचा सत्कार खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला महायुतीचे नेते डॉ. परिणय फुके, आमदार राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, राजू कारेमोरे तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन व सुनील फुंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी महायुती तयार करून 20 पैकी 14 संचालक निवडून आणले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) परिवर्तन पॅनेलमधून 6 संचालक विजयी झाले. यामध्ये राजेंद्र जैन यांची पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर अध्यक्षपदी निवड झाली.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील महायुतीने मोठा विजय मिळवला. एकूण 21 पैकी 17 संचालक महायुतीकडून निवडून आले, तर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व उभाठा यांचा परिवर्तन पॅनेल केवळ 4 जागांवर विजयी झाला.
या विजयी संचालक मंडळाचा गौरव करण्यासाठी आयोजित सत्कार सोहळ्यात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








