Home Latest News अठराभुजा गणरायाचे एकमेव मंदिर : ५०० वर्षांचा समृद्ध इतिहास

अठराभुजा गणरायाचे एकमेव मंदिर : ५०० वर्षांचा समृद्ध इतिहास

0
64

रामटेक सचिन चौरसिया, ५  – श्रीरामाच्या चरणांनी पावन झालेल्या रामटेक गडाच्या पायथ्याशी असलेल्या शैवल्य पर्वतावर अठरा भुजा गणेशाचे प्राचीन मंदिर आजही भक्तांचे श्रद्धास्थान आहे. हा पर्वत प्राचीन काळी शंबूक ऋषींचे आश्रयस्थान आणि विद्याधर संस्कृतीचे केंद्र मानले जाते. अठरा विषयांचे ज्ञान असलेल्या विद्याधराच्या संकल्पनेतून या आगळ्या-वेगळ्या गणेशरूपाची कल्पना आकारास आली असे मानले जाते.

येथील मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण स्फटिकाची असून अठराभुजा असलेला गणेश महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही आढळत नाही. हा एकमेवाद्वितीय विघ्नहर्ता केवळ विदर्भाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे वैशिष्ट्य मानला जातो. गणेशपुराणात या रूपाला ‘विघ्नेश्वर’ म्हणून मान्यता आहे. मूर्तीत १८ हात असून प्रत्येक हातात भिन्न शस्त्र आहे. गळ्यात व कंबरेला नागपट्टा, मोरपंख, मुदगल, कुऱ्हाड, मोदक इत्यादींनी सजलेली ही मूर्ती कमळाच्या आसनावर विराजमान आहे.

मंदिराच्या मध्यभागी महागणपती, तर डाव्या बाजूला रिद्धी-सिद्धी गणेश मूर्ती आहे. तसेच महालक्ष्मीची मूर्ती देखील दर्शनास येते. मंदिराच्या देखरेखीची जबाबदारी श्री अठराभुजा गणेश देवस्थान पंच कमेटी, रामटेक यांच्याकडे असून, दरवर्षी गणेश चतुर्थीला नऊ दिवसीय मोठा उत्सव, पूजन-अर्चा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. स्थानिक स्वयंसेवक मंडळाचे अध्यक्ष हुकुमचंद बडवाईक, रितेश चौकसे, विजय सलामे, ऋषिकेश किमतकर, सुमित कोठारी, गुड्डु बघेले, स्वप्निल खोड़े, रवि मथुरे, रवि महाजन, गोलू खेडकर, कमलाकर महाजन आणि दिलीप मेहरकुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते हे उत्सव साजरे करण्यासाठी कार्यरत असतात.

इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले हे मंदिर १६ व्या शतकात बांधले गेले असून, आज महाराष्ट्र शासनाने यास “क दर्जा तीर्थक्षेत्र” घोषित केले आहे. त्यामुळे भक्तांसाठी हे मंदिर धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अधिकच महत्त्वाचे मानले जाते.