युवक, अल्पसंख्याक या मजूर पक्षाच्या पारंपरिक मतदारांना ग्रीन पार्टीने आपल्याकडे ओढले, तर ज्येष्ठ, मध्यमवयीन आणि ग्रामीण या हुजूर पक्षाच्या मतदारांना ‘रिफॉर्म यूके’ने…
ब्रिटनमध्ये गेली काही वर्षे एक विचित्र वास्तव सातत्याने अधोरेखित होत आहे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमताने एखादा पक्ष निवडून येतो. संसदीय लोकशाहीत स्थैर्याचा तो पहिला टप्पाच. स्थैर्याच्या पायावर पुढे निर्णयांची, धोरणांची इमारत उभी राहील हेही अध्याहृत. पण पार्लमेंटमध्ये स्थिरस्थावर बनलेल्या सत्ताधीशांना जनतेचा कौल मानवत नसावा बहुधा. कारण कधी पक्षीय राजकारण, कधी अप्रिय निर्णय वा धोरणे यांच्या माध्यमातून आत्मघात करून घेण्याची खोड बहुतेक राजकारण्यांमध्ये दिसून येते. ब्रिटनमध्ये सन २०१९ मध्ये हुजूर (कॉन्झर्वेटिव्ह) पक्ष मोठ्या बहुमताने निवडून आला. तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या हाताशी त्यांच्या आधी मोजक्याच पंतप्रधानांनी पाहिला होता, असा कौल होता. पण त्यांची उच्छृंखल वृत्ती त्यांच्या पदास अपेक्षित परिपक्वपणा दाखवू शकली नाही. याचा परिणाम नंतरच्या पंतप्रधानांवरही झाला. सत्ता हातात असूनही हुजूर पक्षाला त्या पाच वर्षांच्या काळात बोरिस जॉन्सन, लिझ ट्रस आणि ऋषी सुनाक असे तीन पंतप्रधान द्यावे लागले. त्याच्या आधीची पाच वर्षेही हाच पक्ष सत्तेत होता. त्यावेळी ब्रेग्झिटच्या मुद्द्यावर जनमत घेण्याचा आततायीपणा तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना नडला. त्यांनी कार्यकाळाच्या मध्यावरच राजीनामा दिला, त्यानंतर थेरेसा मे पंतप्रधान बनल्या. पण पक्षांतर्गत विरोध झाल्यामुळे पुढील निवडणूक बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय झाला अन थेरेसा यांची कारकीर्दही अल्पजीवी ठरली. म्हणजे सत्तेच्या दहा वर्षांमध्ये पाच पंतप्रधान! यात स्थैर्य कुठेच आढळून येत नाही. दहा वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत मग विक्रमी पराभव. पण त्यांनी निराश होण्याचे कारण नाही, याची काळजी त्यांचे कट्टर विरोधक ब्रिटनचे विद्यमान सत्ताधीश घेत आहेत. तेथील सध्याचे मजूर (लेबर) पक्षाचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर हेही सन २०२४ मध्ये प्रचंड बहुमताने निवडून आले. तरी त्यांचा मजूर पक्ष सध्या ज्या दिशेने वाटचाल करतो आहे, ते पाहता पुढील सार्वत्रिक निवडणूक त्यांनाही जड जाईल याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. इंग्लंडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच वेल्स आणि स्कॉटलंडमध्ये तेथील स्थानिक पार्लमेंटसाठी गेल्या आठवड्यात निवडणुका झाल्या. यात मजूर पक्ष आणि काही प्रमाणात हुजूर पक्ष या प्रस्थापित पक्षांचा धुव्वा उडाला. त्यांच्या तुलनेत रिफॉर्म यूके या बंदिस्त राष्ट्रवादी विचारधाटणीच्या, स्थलांतरितविरोधी पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. रिफॉर्म यूके पक्षाचे नेते नायजेल फराज हे कट्टर युरोपविरोधी आणि ब्रेग्झिटवादी, तसेच उदारमतवादाची खिल्ली उडवणारे आणि ट्रम्पवादाचे निस्सीम चाहते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पक्षाने गेल्या काही निवडणुकांमध्ये अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती. हे फराज पूर्वी युनायटेड किंग्डम इंडिपेंडंट पार्टी या पक्षात होते. आता नवीन पक्ष स्थापला असला, तरी विचार जुनेच. पण इंग्लंडमध्ये या पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळपास १४०० जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले. स्कॉटलंड आणि वेल्स येथील स्थानिक पार्लमेंट निवडणुकांमध्येही जागा जिंकल्या. जागा किती जिंकल्या यापेक्षाही जेथे वर्षानुवर्षे मजूर आणि हुजूर या दोन प्रस्थापित, पारंपरिक पक्षांची घट्ट पकड होती, अशा ठिकाणी रिफॉर्म यूके पक्षाने मारलेली मुसंडी दखलपात्र अशीच. उत्तर इंग्लंडमध्ये अनेक कौंटींमध्ये वर्षानुवर्षे मजूर पक्षाचे उमेदवार निवडून यायचे तेथे रिफॉर्म यूकेने प्रस्थापितांना धक्का दिला. लंडनसारख्या राजधानीच्या शहरात या पक्षाने हुजूर पक्षाकडून पहिला ‘बरो’ जिंकून घेतला. वेल्स पार्लमेंटमध्ये हा पक्ष दुसर्या क्रमांकावर आला, तेथे मजूर पक्ष तिसर्या क्रमांकावर फेकला गेला.
कीर स्टार्मर यांच्यासाठी या निवडणुका म्हणजे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतली पहिली अग्निपरीक्षा होती. त्यात ते सपशेल नापास झाले. यावरून पक्षात त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही, मात्र पराभवाचा नम्रपणे स्वीकार करतो असे म्हणत स्टार्मर यांनी उसने अवसान दाखवले खरे, पण त्यांच्या जवळपास प्रत्येक पूर्वसुरींनी तसे ते दाखवले होते आणि तरीही त्यांना जावे लागले. ब्रिटिश लोकशाहीमध्ये पक्षांतर्गत नेताबदलाची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. यातून मोजक्यांची मनमानी आणि दंडेली चालू नये असे अपेक्षित असते. त्यामुळे तूर्त स्टार्मर यांच्या पदास धोका नाही. पण त्यांच्या पक्षाची पीछेहाट पाहता, सन २०२९ मधील निवडणूक त्यांच्या पक्षास किती आव्हानात्मक ठरेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. त्यांच्या सुदैवाने मजूर पक्षाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या हुजूर पक्षाची कामगिरीही सुमार झाली.
यातून दोन्ही पक्षांनी धडा घ्यावा अशीच ही निवडणूक ठरली. तो धडा म्हणजे, पर्यायी पक्षांची वाढ. रिफॉर्म यूकेप्रमाणेच इंग्लंडमध्ये ग्रीन पार्टी या आणखी एका पक्षाने काही महत्त्वाचे विजय मिळवले. ग्रीन पार्टी हा नावाप्रमाणेच पर्यावरणवादी आणि डाव्या विचारसरणीकडे झुकलेला पक्ष. या पक्षाला युवकांमधून मिळणारा पाठिंबा नोंदणीय ठरला. ग्रीन पार्टीने मजूर पक्षाच्या पारंपरिक मतदारांना – युवक आणि अल्पसंख्याक – आपल्याकडे ओढले. या कलबदलाची दखल मजूर नेतृत्वाने घेतली नाही, तर आगामी काळात असे धक्के त्यांना वारंवार खावे लागतील. तिकडे हुजूर पक्षाचा पारंपरिक मतदार – ज्येष्ठ व मध्यमवयीन आणि ग्रामीण – रिफॉर्म यूके पक्षाच्या पारड्यात भरभरून मते टाकत आहे. ब्रिटनमध्ये अजून तरी स्थानिक निवडणुकांच्या निकालांचे पडसाद राष्ट्रीय निवडणुकांमध्ये फारसे उमटत नाहीत. पण बदलत्या काळात हे असेच राहणार याची हमी कोणीही देऊ शकत नाही. मतदारांचा रोष हा सत्तारूढांच्या विरोधात विशेष असतो हे आता प्रगल्भ म्हणवल्या जाणार्या लोकशाही व्यवस्थांमध्येही दिसून येऊ लागले आहे. लोकानुनयी, राष्ट्रकेंद्री, धर्म व वंशकेंद्री, ‘परजीवी’विरोधी मुद्द्यांवर झटपट आणि मोठ्या संख्येने निवडून येता येते याची चटक आणि चुणूक लागलेल्या नेत्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या आक्रमक, भयद्वेषयुक्त प्रचाराला भुलणार्या मतदारांची संख्याही वाढीस लागली आहे. या रेट्यासमोर मध्यममार्गी, उदारमतवादी, सर्वसमावेशक राजकीय विचारधारा कुचकामी आणि अल्पजीवी ठरू लागल्या आहेत याची नोंद घेणे भाग पडत आहे.
ब्रिटनचा राजकीय पोत बदलत चालल्याचे, तेथील द्विपक्षीय मक्तेदारी संपुष्टात येऊ लागल्याचे या निवडणुकांनी दाखवून दिले. युरोपशी काडीमोड घेतल्यानंतर ब्रिटनमधील मतदार आणि नेतेही गोंधळल्यागत झाले आहेत. पण आता मतदारांसमोर एक-दोनपेक्षा अधिक पर्याय उपलब्ध आहेत. रिफॉर्म यूके पक्षाचे सध्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सहाच खासदार आहेत. ही संख्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीत वाढेल हे नक्की. ग्रीन पार्टीचा उदय लोकशाहीवाद्यांसाठी आश्वासक ठरतो. जर्मनी आणि फ्रान्स या इतर दोन मोठ्या युरोपीय देशांमध्येही उजव्या विचारसरणीचे पक्ष वाढत आहेत. पण त्यांची झेप अद्याप सत्तास्थानापर्यंत गेलेली नाही. तरी या दोन देशांप्रमाणेच ब्रिटनमध्येही प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये मतदारांपासून दुरावत चालल्याची भावना आहे आणि यावर उपाय काय असावा याविषयी अनभिज्ञता आहे. शंभरहून अधिक वर्षे जुना इतिहास असलेल्या या पक्षांसाठी हे अजिबातच शुभलक्षण नाही. किंबहुना, रसरशीत आणि सशक्त लोकशाही मूल्यांसाठी ओळखल्या जाणार्या युरोपसाठीही अशा धोक्याच्या घंटा वारंवार वाजू लागल्या आहेत. अल्पकालीन, संकुचित फायद्यांचे आश्वासन देणार्या पक्षांची वाढ होत आहे, तेथे विशाल जनाधार असलेल्या पक्षांना मात्र एखाद्या निवडणुकीत अक्षरश: फेकून दिले जात आहे. मजूर पक्षाने हे अनुभवले, हुजूर पक्षानेही हे पाहिले. सत्ताधीशांची अशी ससेहोलपट वारंवार का होते आणि ती थांबवायची कशी या विवंचनेत हे दोन्ही पक्ष सापडले आहेत. कदाचित त्यांची ही अवस्था आधुनिक जागतिक व्यवस्थेत प्रतीकात्मकही आहे.